मालेगाव : तालुक्यातील दहिवाळसह २६ गाव पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरल्याने ऐन उन्हाळ्यात टंचाईचे संकट झेलणाऱ्या माळमाथा भागातील महिला-पुरुषांनी येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. प्रत्येक गावास आठवड्यातून एकदा पूर्ण क्षमतेने पाणी देण्याचे आश्वासन मिळाल्यावर आंदोलन स्थगित करण्यात आले.

दहिवाळसह २६ गाव पाणीपुरवठा योजनेंतर्गत १० ते १५ दिवसांनी पाणीपुरवठा करण्यात येत असल्यामुळे टंचाईच्या समस्येने लोक त्रस्त आहेत. १५ मे रोजी दहिवाळ परिसरातील गावकऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कार्यवाही न झाल्याने हंडा मोर्चा काढण्यात आला. दहिवाळसह २६ गाव पाणी योजना कुचकामी ठरत असल्याने २२ कोटी ९० लक्ष रुपये खर्च करून दोन वर्षांपासून तिच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे टंचाई समस्येचे निराकरण होत नसल्याचा गावकऱ्यांचा आक्षेप आहे. तसेच या कामाचा दर्जाही निकृष्ट असल्याची तक्रार आहे. एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात नाही तोपर्यंत पाणीपट्टी आकारू नये, झोडगे, गुगुळवाड, भिलकोट, पळासदरे, पाडळदे या गावांना उपयुक्त ठरणाऱ्या मेळवण धरणाचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे, मालेगाव जिल्हानिर्मिती करण्यात यावी आदी मागण्याही मोर्चेकऱ्यांच्या वतीने करण्यात आल्या.

हेही वाचा – रस्ता खोदकामांनी नाशिक विद्रुप; स्मार्ट सिटी, मनपाविरोधात काँग्रेसचे आंदोलन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या संदर्भात अप्पर जिल्हाधिकारी माया पाटोळे यांनी बैठक घेऊन उभयपक्षी चर्चा केली. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपविभागीय अधिकारी अनिल पगार यांनी प्रत्येक गावास आठवड्यातून एकदा पूर्ण क्षमतेने पाणी देण्याचे आणि लवकरच रोज पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले जाईल, असे लेखी आश्वासन दिले. या मोर्चात निखिल पवार, शेखर पगार, भास्कर गोसावी, योगेश साळे, आर. डी. निकम आदी सामील झाले होते.