मिणमिणत्या मेणबत्तीच्या प्रकाशात नाम स्मरणात तल्लीन झालेला साधू.. अंगावर विविध आभुषणे मिरवत अत्याधुनिक जीवनशैली अंगीकारलेले साधू.. टाळ-मृदुंगाच्या गजरात भजनात रममाण झालेला साधू.. कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या साधूंच्या अशा विविध भावमुद्रा छायाचित्रांच्या माध्यमातून नव्याने समोर येणार आहेत. छायाचित्रकार किरण तांबट यांनी ‘छटा आणि जटा’ छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून साधुंचे विश्व उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रदर्शनास बुधवारपासून कंसारा मंगल कार्यालयात सुरुवात होत आहे.
नाशिक-त्र्यंबक येथे झालेल्या कुंभमेळ्यासाठी लाखो भाविकांची मांदियाळी जमली. तब्बल बारा वर्षांनी भाविकांना साधू-महंतांचे दर्शन घडले. साधू-महंतांचे भावविश्व तसेच दिनचर्येविषयी अनेकांना कुतूहल असते. हे कुतहल शमविण्यासाठी तांबट यांनी ‘छटा आणि जटा’ प्रदर्शनाद्वारे त्यांचे विश्व छायाचित्रांच्या माध्यमातून पुढे आणले आहे. या अनोख्या प्रदर्शनाचे उद्घाटन विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले, पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्या हस्ते होणार आहे. नाशिक-त्र्यंबक येथील शैव-वैष्णव पंथीय साधुंच्या जीवनशैलीवर प्रकाश टाकतांना त्यांचा पेहराव, त्यांची आभूषणे, गंध लावण्याच्या पध्दती, भजनाद्वारे देवाशी एकरूप होण्याची कला आदींचा त्यात समावेश आहे. सिंहस्थातील अनेक क्षणचित्रे कॅमेऱ्यात बंदीस्त झाली असून ती पहाण्याची पर्वणी कलाप्रेमींना प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणार आहे. तांबट यांच्या काही निवडक छायाचित्रांचा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने आपल्या ‘कॉफी टेबल बुक’ मध्येही समावेश केला आहे. मागील कुंभमेळ्यात तांबट यांनी सिंहस्थातील विविध पैलुंवर प्रकाश टाकणारे छायाचित्र प्रदर्शन भरविले होते. यातील काही छायाचित्रांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान झाला आहे. शनिवापर्यंत सायंकाळी पाच ते रात्री १० या वेळेत प्रदर्शन खुले राहणार आहे. त्याचा शहरवासीयांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन तांबट यांनी केले आहे.