मालेगाव : गावठी डुक्करांचे कुत्र्यांपासून रक्षण व्हावे,यासाठी डुक्कर मालकांनी चक्क विषप्रयोग करण्याचा संतापजनक प्रकार बागलाण तालुक्यातील अंबासन येथे उघडकीस आला. यामुळे गावातील जवळपास २० कुत्री व तीन मांजरींचा मृत्यू झाला. या प्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

गावात तीन कुत्री मरून पडल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले होते. एकाच दिवशी ही कुत्री का मेली असावीत, याविषयी गावकरी संभ्रमात असतानाच शनिवारी सकाळी १० वाजेनंतर गावातील सावता चौक व अंगणवाडी केंद्राजवळ एकापाठोपाठ कुत्र्यांचा तडफडून मृत्यू होत असल्याचे दृश्य समोर आले. दोन दिवसात जवळपास २० कुत्र्यांचा अशा रितीने मृत्यू झाला. तसेच तीन मांजरांचाही मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. यामुळे गावात संतप्त प्रतिक्रिया उमटली. विष प्रयोगामुळे कुत्री व मांजरींचा मृत्यू झाला असावा, असे अनुमान गावकऱ्यांनी काढले. परंतु हा विषप्रयोग कोणी व का केला असावा, याबद्दल गावकऱ्यांच्या मनात कोडे निर्माण झाले.

यानंतर संतप्त गावकऱ्यांनी दुपारी ग्रामसभा भरवली. यावेळी खाद्य पदार्थांमध्ये विष कालवून ते कुत्र्यांना खाऊ घातल्याची कबुली गावातील दोघा डुक्कर मालकांनी दिली. ही कुत्री आमच्या डुक्करांना चावा घेतात, त्यांना मारून टाकतात म्हणून हा विष प्रयोग केल्याचा युक्तिवाद देखील त्यांनी केला. यानंतर गावकऱ्यांनी या संदर्भात पोलीस ठाण्यात माहिती दिल्यावर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. दरम्यान पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. डी. एस.पठाडे यांनी गावी भेट देऊन मृत कुत्र्यांचे शिवछेदन केले. नंतर खड्डा खोदून ग्रामपंचायत प्रशासनातर्फे मृत कुत्री व मांजरींचे दफन करण्यात आले.

पिल्लांची आई गेली सोडून…

एका कुत्रीने दोन दिवसांपूर्वीच चार-पाच पिल्लांना जन्म दिला होता. शनिवारी सकाळी विषप्रयोग केलेले खाद्यपदार्थ खाल्ल्याने अवतीभोवती असलेल्या लहान पिल्लांजवळ ती अक्षरशः तडफडत होती. नंतर काही वेळाने तिनेही प्राण सोडले. हे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते. जन्मदाती आई सोडून गेलेल्या दोन-तीन दिवसांच्या या पिल्लांना मग गावकऱ्यांनी दूध पाजून भूतदया जागवली.

डुक्करांच्या उपद्रवामुळे शेतकरी त्रस्त

मोसम नदी काठावर असलेल्या अंबासन परिसरात उत्तम पद्धतीने शेती केली जाते. हा भाग डाळिंब पट्टा म्हणून प्रसिद्ध आहे. गाव परिसरात जवळपास १५० ते २०० डुक्करे अस्तित्वात आहेत. गावात तसेच शेत शिवारात या डुक्करांचा मुक्त संचार असतो. अनेकदा ही डुक्करे शेती पिकांचे नुकसान करीत असतात. डुक्करांच्या उपद्रवामुळे शेतकरी अक्षरशः त्रस्त झाले आहेत. गेल्या चार-पाच वर्षांपासून ही समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे या डुक्करांचा बंदोबस्त करण्यासाठी यापूर्वी ग्रामसभेत वारंवार विशेष चर्चेत आला आहे. मात्र त्यावर अद्यापही उपाययोजना केली जात नाही. शेतकऱ्यांचा जसा शेती व्यवसाय आहे, तसा आमचा वराह पालन व्यवसाय आहे व त्यावर आमची उपजीविका चालते, असे बेजबाबदार उत्तर डुक्कर मालकांकडून दिले जात असल्याची स्थानिक शेतकऱ्यांची तक्रार आहे. त्यामुळे या प्रकरणी न्याय कोणाकडे मागावा असा प्रश्न या शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.