गायीचा शवविच्छेदन अहवाल देण्यासाठी मंगळवारी १५०० रुपयांची लाच स्वीकारताना सिन्नरचा पशु विकास अधिकारी मानसिंग शिसोदे आणि खासगी व्यक्ती पैगंबर गुलाम मुलानी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात ताब्यात घेतले.
तक्रारदाराच्या गायीचा ४ नोव्हेंबर रोजी वीज पडून मृत्यू झाला होता. या गायीचे शवविच्छेदन सिन्नरच्या पशु वैद्यकीय दवाख्यानात करण्यात आले होते. तक्रारदाराने शवविच्छेदन अहवालाची मागणी केली असता पशु विकास अधिकारी शिसोदे याने दोन हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने आपल्या खिशात ५०० रुपये असल्याचे सांगितल्यावर हे पैसे घेऊन शिसोदेने उर्वरित १५०० रुपये नंतर देण्यास सांगून अहवालाची प्रत दिली. दरम्यानच्या काळात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
मंगळवारी सिन्नरच्या पशु वैद्यकीय दवाखान्याशेजारील पडकी वेस या ठिकाणी सापळा रचण्यात आला.
यानंतर दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही रक्कम पैगंबर गुलाम मुलानी याच्यामार्फत पशुधन विकास अधिकारी स्वीकारत असताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले.
या प्रकरणी मानसिंग शिसोदे व मुलानी यांच्याविरुध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.