नाशिक : कुंभमेळ्यातील नियोजनावरून चाललेल्या राजकीय संघर्षात दुसरीकडे महानगरपालिकेत स्थानिक-परसेवेतील अधिकारी यांच्यात वादाचा नवीन अंक सुरू झाला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांना डावलून परसेवेतील अधिकाऱ्यांना महापालिकेत सेवा संधी देण्यास शिवसेना शिंदे गटाने विरोध दर्शविला आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या सेवेतील कार्यकारी अभियंता महुआ बॅनर्जी या मध्यंतरी मनपा सेवेत दाखल झाल्या. परसेवेतील या अधिकाऱ्यास महापालिकेत कार्यकारी अभियंता पदावर प्रतिनियुक्तीने मान्यता देण्याबाबत महापालिकेने पत्र व्यवहार केल्याचे शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. मुळात, बॅनर्जी यांच्याकडे महाराष्ट्र अभियांत्रिकी पर्यावरण प्रशिक्षण व संशोधन (मित्रा) या कार्यालयातील अधीक्षक अभियंता तथा संचालक (मित्रा) या पदाचा देखील अतिरिक्त कार्यभार आहे. परसेवेतील अधिकाऱ्याला मनपाच्या कार्यकारी अभियंतापदी संधी देणे म्हणजे स्थानिक अधिकाऱ्यांवर अविश्वास दाखवण्याचा, त्यांना सेवा संधी आणि त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवण्याचा प्रकार असल्याचा आक्षेप शिवसेना शिंदे गटाने नोंदविला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या सेवेतील बॅनर्जी यांना महापालिकेत रुजू करून घेण्याची आवश्यकता काय, असाही प्रश्न तिदमे यांनी केला.

स्थानिक अधिकाऱ्यांना सिंहस्थ कुंभमेळा व शहरातील कामांची माहिती आहे, त्यांना संधी दिल्यास ते अधिक योग्य काम करतील, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. परसेवेतून महापालिकेत दाखल झालेल्या बॅनर्जी यांच्याकडे कार्यकारी अभियंता पदाचा कार्यभार दिला गेलेला नाही, असे मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. नाशिक महापालिकेत स्थानिक-परसेवेतील अधिकारी यांच्यात स्थापनेपासून वाद आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, मनुष्यबळाची कमतरता भेडसावत आहे. या स्थितीत परसेवेतील अधिकाऱ्यांना विरोध होत असल्याचे काही जणांकडून आश्चर्य व्यक्त होेते. तर काही जण या वादामागे वेगळेच कारण असल्याचे सांगतात.

तुलनात्मक अभ्यासाची गरज…

कुठल्याही मोठ्या महापालिकेच्या कामकाजात स्थानिक अधिकारी व परसेवा अधिकारी यांच्यात वाद असणे स्वाभाविक आहे. त्याला नाशिक महापालिकाही अपवाद नाही. मुळात अशा वादाला स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्यातील ‘अर्थपूर्ण’ नात्याची किनार असते. त्यात कार्यक्षमता व शहर विकास यांचा दुरान्वयेही संबंध नसतो, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते संदीप डोळस व्यक्त केली. कोणत्याही शासकीय आस्थापनेत काम करणारे अधिकारी हे व्यक्तिपरत्वे स्वयंसिद्ध असतात. नाशिक महापालिकेत हा वाद स्थापनेपासून आहे. खरेतर मागील दोन ते अडीच दशके येथे स्थानिकांचाच वाव होता. त्यांच्या कार्यकाळात किती कार्यक्षम काम झाले, याचाही तुलनात्मक अभ्यास होणे गरजेचे असल्याकडे डोळस यांनी लक्ष वेधले.