नाशिक – जिल्ह्यातील १३ कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी मनमाडचा अपवाद वगळता उर्वरित १२ ठिकाणी शुक्रवारी मतदान होत आहे. घोटी, देवळा, कळवण, दिंडोरी आणि सिन्नर या समित्यांची लगेचच त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. नाशिक, पिंपळगाव बसवंत, चांदवड, येवला, मालेगाव आणि लासलगाव या बाजार समित्यांची मतमोजणी मतदानाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी होईल. तर नांदगाव बाजार समितीची रविवारी मतमोजणी होईल. मनमाड बाजार समितीच्या निवडणुकीत रविवारी मतदान तर, सोमवारी मतमोजणी होणार आहे.

जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया राबविली गेली. यातील सुरगाणा बाजार समितीत सर्व जागांवर बिनविरोध निवड झाली. त्यामुळे उर्वरित १३ बाजार समित्यांसाठी मतदान होत आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येला म्हणजे गुरूवारी निवडणूक कर्मचारी मतदान प्रक्रियेचे साहित्य घेऊन आपापल्या केंद्रांवर रवाना झाले. कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मतदान केंद्र व मतमोजणीस्थळी पोलीस यंत्रणेने बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. नाशिक बाजार समितीसाठी १३ केंद्रांवर मतदान होणार आहे. यात गिरणारे, पाथर्डी गाव, सिन्नरफाटा, पेठ, जागमोडी, त्र्यंबकेश्वर, ठाणापाडा यांचा समावेश आहे. या बाजार समितीची मतमोजणी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल कर्मचारी संघटना सभागृहात होईल. पिंपळगाव बाजार समितीसाठी १० केंद्रांवर मतदान होत आहे. त्यात पिंपळगाव, मांजरगावचा समावेश आहे. या बाजार समितीच्या आवारातील शेतकरी भवन येथे मतमोजणी होणार आहे.

हेही वाचा >>>क्रिप्टोत नफ्याचे आमिष दाखवून तरुणाला १५ लाखांचा गंडा

येवला बाजार समितीसाठी सात केंद्रांवर मतदान होईल. येथील मतमोजणी शनिवारी मनमाड रस्त्यावरील सिध्दार्थ लॉन्स येथे होणार आहे. चांदवड बाजार समितीसाठी सात केंद्रांवर मतदान होऊन गणूर रस्त्यावरील चंद्रभागा लॉन्स येथे मतमोजणी होईल. मालेगाव बाजार समितीसाठी १२ केंद्रांवर मतदान होणार आहे. त्यात मालेगाव, सौंदाणे, निमगाव आणि झोडगेचा समावेश आहे. मतमोजणी प्रक्रिया मालेगाव कॅम्प येथील ब्राम्हण समाज मंगल कार्यालयात होणार आहे. लासलगाव बाजार समितीसाठी सात केंद्रांवर मतदान होईल. निफाड येथील उपबाजार आवारातील शेतकरी निवास येथे मतमोजणी होणार आहे. नांदगाव बाजार समितीसाठी सहा केंद्रांवर मतदान होईल. मतमोजणी रविवारी नांदगाव तहसील कार्यालयातील प्रशासकीय इमारतीत होणार आहे. जिल्ह्यात मनमाड या एकमेव बाजार समितीसाठी मतदान आणि मतमोजणीसाठी वेगळे दिवस निवडले गेले. या ठिकाणी रविवारी चार केंद्रांवर मतदान होईल. तर सोमवारी मनमाड शहरातील सेंट झेव्हियर्स हायस्कूलमध्ये मतमोजणी होणार आहे.

हेही वाचा >>>जळगावात चोराकडून ३१ सायकली जप्त

पाच समित्यांची लगेच मतमोजणी

घोटी, देवळा, कळवण, दिंडोरी आणि सिन्नर या समित्यांच्या निवडणुकीत मतदान झाल्यानंतर लगेचच मतमोजणी होणार आहे. घोटी बाजार समितीसाठी १२ केंद्रांवर मतदान होईल तर मतमोजणी घोटीतील जैन भवन येथे होणार आहे. कळवण बाजार समितीच्या निवडणुकीत सहा केंद्रांवर मतदान होऊन कळवण येथील छत्रपती मंगल कार्यालयात मतमोजणी होणार आहे. दिंडोरी बाजार समितीसाठी सात केंद्रांवर मतदान तर दिंडोरीतील सांस्कृतिक भवन येथे मतमोजणी होणार आहे. सिन्नर बाजार समितीच्या निवडणुकीत १६ केंद्रांवर मतदान होणार आहे. मतमोजणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक कला व क्रीडा संकुलात होणार आहे. देवळा बाजार समितीसाठी तीन केंद्रांवर मतदान तर, मुलींच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मतमोजणी होणार आहे.