नाशिक : नाशिकच्या वैभवात भर घालणाऱ्या प्रमोद महाजन उद्यानाचे भाउबीजेच्या दिवशी लोकार्पण करून ते नाशिककरांसाठी खुले करण्यात आले. उद्यान खुले होताच मोठया संख्येने पर्यटकांनी बालगोपाळांसह गर्दी केली. काहींच्या अतिउत्साहात उद्यानातील खेळण्यांची नासधूस झाली. या घटनेमुळे खेळण्यांची दुरूस्ती, सुरक्षा उपाय योजण्यासाठी दोन नोव्हेंबरपर्यंत उद्यान बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.

नाशिक हे उद्यानांचे शहर म्हणून ओळखले जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून अनेक उद्याने बंद अवस्थेत आहेत. तर काही उद्यानांची दुरावस्था झाली आहे. नागरिकांना भ्रमंती करता यावी तसेच बालगोपाळांना सुटीचा आनंद लुटता यावा, याकरीता आमदार देवयानी फरांदे यांच्या पुढाकारातून गंगापूर रस्त्यावरील प्रमोद महाजन उद्यानाचे नुतनीकरण करण्यात आले. ‘भाऊबीज पहाट’ कार्यक्रमात सुरेश वाडकर यांच्या उपस्थितीत त्याचे लोकार्पण झाले. या ठिकाणी बाल गोपाळांचे आकर्षण असलेली छोटा भीम, चुटकी, जग्गू, कालिया, गोलू अशी बालविश्वातील आवडत्या कार्टून पात्रांची खेळणी बसविण्यात आली. समृध्द हिरवळ, नाविन्यपूर्ण खेळणी, सुबक रचना, फायबरच्या प्राण्यांच्या मूर्ती बसविण्यात आल्या. नागरीकांना पायी भ्रमंतीसाठी ट्रॅकची व्यवस्था आहे.

उद्यानाचे लोकार्पण होताच पहिल्याच दिवशी शेकडोच्या संख्येने नागरिकांनी बालगोपाळांसह गर्दी केली. काही हौशी लोकांना लहानग्यांसाठी साकारलेल्या कार्टून पात्रांवर स्वतःच बसत फोटोसेशनचा मोह आवरता गेला नाही. यामुळे खेळण्यांचे नुकसान झाले. काही खेळणी अर्धवट तुटली. उद्यानात उभारण्यात आलेल्या सिंह, हरिण आदी प्राण्यांची शेपूटही तोडल्याचे निर्देशनास आले. काही बहाददरांनी लहान मुलांच्या खेळण्यांवर स्वतःच बसून छायाचित्रण केल्याचेही चित्रफितीत समोर आले. या घटनेमुळे दुरुस्तीच्या कामासाठी दोन नोव्हेंबरपर्यंत प्रमोद महाजन उद्यान बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. शनिवारी मोठया संख्येने पर्यटक उद्यानात आले होते मात्र, ते बंद असल्याने त्यांचा हिरमोड झाला. यावेळी आमदार देवयानी फरांदे यांनी नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांना वस्तूस्थिती सांगितली.

अनोख्या संकल्पनेतून साकारलेले प्रमोद महाजन उद्यान नाशिकचे नवे आकर्षण ठरणार आहे. परंतू उद्यान खुले होताच काही नागरीकांच्या अतिउत्साहीपणामुळे खेळण्यांची दुरावस्था झाली. त्यामुळे उद्यान काही दिवस बंद ठेवणे क्रमप्राप्त ठरले. उद्यानात वावरतांना नागरिकांनी जबाबदारीचे भान ठेवणे आवश्यक आहे. आपले वैभव जपण्यासाठी सार्वजनिक मालमत्तांची देखील तितकीच काळजी घ्यायला हवी. या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी महापालिकेकडे करण्यात आली आहे. आमदार देवयानी फरांदे