जळगाव – माजी मंत्री गुलाबराव देवकर तसेच डॉ. सतीश पाटील यांच्यासह इतर मातब्बरांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार) प्रवेश केल्याने जिल्ह्यात शरद पवार गटाची मोठी हानी झाली आहे, अशी कबुली या पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. विशेष म्हणजे भाजपमध्ये प्रवेश न करता पुरोगामी विचारांच्या अजित पवार गटात प्रवेश केल्याबद्दल त्यांनी पक्ष सोडून गेलेल्या सर्वांना शुभेच्छाही दिल्या.
माजी मंत्री देवकर आणि डॉ.पाटील यांच्यासह चोपड्याचे माजी आमदार कैलास पाटील, विधान परिषदेचे माजी सदस्य दिलीप सोनवणे, जळगाव जिल्हा बँकेच्या माजी संचालक तिलोत्तमा पाटील यांनी शनिवारी मुंबईत शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देत अजित पवार गटात प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर पक्षाची भूमिका मांडण्यासाठी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, महानगर अध्यक्ष एजाज मलीक यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पक्ष सोडून गेलेल्या सर्वांनी पक्षाची ताकद वाढविण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले. त्यांनी पक्ष संघटन वाढीसाठी केलेले योगदान कधीच विसरता येणार नाही. परंतु, पक्ष संकटात असताना नेमकी त्यांनी सोडचिठ्ठी दिली. कदाचित बदललेली राजकीय परिस्थिती त्याला कारणीभूत ठरली असेल. वास्तविक दोन्ही माजी मंत्र्यांसाठी शरद पवार गटाने विधानसभेच्या निवडणुकीत चार जागांवर पाणी सोडले होते. कारण, ते दोघे गुणवत्तावान उमेदवार होते. मात्र, ते पराभूत झाले, दिग्गज सोडून गेल्यानंतरही पक्षाबरोबर असलेले पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नवीन उभारी देण्याचा तसेच नवीन कार्यकर्ते जोडण्याचा प्रयत्न आम्ही करू, असे पाटील यांनी नमूद केले.