नंदुरबार – रस्ताच नसल्याने गरोदर महिलेला बांबुच्या झोळीतून प्रसूतीसाठी डोंगर-दऱ्यातून तब्बल सात किलोमीटर पायपीट करीत प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यासाठी नातेवाईकांना धडपड करावी लागल्याचा प्रकार शहादा तालुक्यात उघडकीस आला. महिलेची प्रसूती सुखरुप झाली असून महिला आणि बाळ दोघे व्यवस्थित असले तरी यामुळे आदिवासी भाग अजूनही रस्ते, आरोग्य अशा सुविधांपासून किती दूर आहे, हे दिसून आले.

शहादा तालुक्यातील नागझिरी ग्रामपंचायतीतंर्गत बुरीनमाळपाडा येतो. येथील आशा पावरा यांना सोमवारी सकाळी साडेदहा वाजता प्रसूतीच्या कळा सुरु झाल्याने त्यांना राणीपूर प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत नेण्यासाठी नातेवाईकांची धावपळ सुरु झाली. त्यांच्या गावापासून राणीपूरपर्यंत जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे नातेवाईकांनी आशा यांना बांबुच्या झोळीत झोपवून डोंगर, दऱ्यातून पायपीट सुरु केली. सुमारे सात किलोमीटरचे अंतर पार करुन राणीपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. केंद्रात आशा यांची सुखरुप प्रसूती झाली.

दुसरीकडे, या घटनेमुळे नंदुरबार जिल्ह्यातील समस्या पुन्हा उघड झाल्या. आजही जिल्ह्यातील ७० गावे आणि ३५० पेक्षा अधिक पाड्यापर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने अशा ठिकाणी रुग्णवाहिका पोहचू शकत नाही. त्यामुळे आदिवासींना बांबुझोळी हाच आधार असतो. या झोळीतून रुग्णाला नेण्यासाठी तीन ते चार जण लागतात. डोंगर,दऱ्यातून पायवाट काढताना झोळी वाहून नेणाऱ्यांना असह्य वेदना होतात. ग्रामीण भागात रस्त्यांअभावी होणारा हा त्रास संपण्याची आदिवासी कित्येक वर्षांपासून वाट पहात आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, समुदाय अधिकारी, आशा यांना पुढील तीन महिन्यातील प्रसूती मातांना माहेरघर योजनेतंर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात आगामी तीन महिन्यातील गरोदर मातांची यादी करुन रस्ते नसलेल्या ठिकाणच्या मातांसाठी नियोजन पूर्ण केले आहे. सर्व गरोदर मातांची सुखरुप प्रसूती प्राथमिक आरोग्य केंद्रात कशी होईल, यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील आहे.  – डॉ, रवींद्र सोनवणे (जिल्हा आरोग्य अधिकारी, नंदुरबार)