जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील अपघातांची संख्या वाढल्यानंतर बाह्यवळण मार्गाचे काम हाती घेण्यात आले. बहुप्रतिक्षीत असा हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर विकासाला केवळ एक नवी दिशा मिळालेली नाही तर शहराचा उत्तरेकडे विस्तार होण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. नवी मुंबईच्या धर्तीवर नवे जळगाव त्या दिशेने विकसित होण्याची चिन्हे दिसत असताना, शहरालगतच्या गावांनाही आता भाव आला आहे.

पाळधी ते तरसोद दरम्यानच्या १७.७० किलोमीटर लांबीच्या बाह्यवळण महामार्गाचे काम अखेर पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे. या कामासाठी कंत्राटदाराला मूळत: २६ महिन्यांची मुदत देण्यात आली होती. मात्र, भूसंपादनातील अडचणींसह तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे ठरलेल्या वेळेत काम पूर्ण होऊ शकले नाही. दीर्घ प्रतीक्षेनंतर आता या मार्गाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. गुणवत्तेची खात्री करण्यासाठी वाहतूक चाचणी, डांबरीकरणाचे कोटिंग, दिशादर्शक फलक, सेवा रस्त्यांची उभारणी तसेच विद्युतीकरण यासारखी कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नुकतीच पाळधी ते तरसोद या मार्गावर प्रत्यक्ष प्रवास करून संपूर्ण पाहणी केली. त्यांच्या भेटीनंतर या बाह्यवळण मार्गावरून प्रायोगिक स्वरूपात एका बाजूने वाहतूक सुरू झाली असून, लवकरच बाह्यवळण महामार्ग नियमित वापरासाठी खुला होणार आहे.

सध्या जळगाव शहराचा विस्तार पूर्व-पश्चिम आणि दक्षिणेकडे मोठ्या प्रमाणावर झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते. या भागात प्रचंड मागणीमुळे जमिनींचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. याउलट, पुरेशा दळणवळण सुविधांचा अभाव असल्याने शहराच्या उत्तरेकडील भागात विकासाची गती अपेक्षेप्रमाणे दिसून येत नव्हती. मात्र, नव्याने तयार होत असलेल्या बाह्यवळण महामार्गामुळे आता उत्तर भागाला नवीन उभारी मिळणार आहे.

शहराच्या उत्तरेला अवघ्या तीन ते चार किलोमीटर अंतरावर मालमत्ता विकास, सेवा क्षेत्र, तसेच वाहतूक आणि पुरवठा व्यवस्थेसाठी अनुकूल वातावरण निर्माण होत आहे. नागरी वस्त्यांसह शैक्षणिक संस्था, रुग्णालये, गोदामे, मंगल कार्यालये, सभागृह उभारण्यासाठी भरपूर मोकळी जागा उपलब्ध असल्याने शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. यामुळे जळगाव शहराच्या संतुलित व सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

अशा परिस्थितीत, जळगावपासून जवळच म्हणजे पाच ते सहा किलोमीटर अंतरावर वसलेल्या आव्हाणे, खेडी, ममुराबाद, आसोदा, तरसोद या काही गावांना देखील आता विकासाची वाट गवसण्याची चिन्हे दिसून आली आहेत. शहरापासून हाकेच्या अंतरावर असतानाही इतके दिवस या गावांनी आपले गावपण जपले होते. आपली शेती बरी आणि आपले गाव बरे, असे म्हणत ग्रामीण भागाशी असलेले आपले नाते त्यांनी घट्टपणे जोपासले होते.

बाह्यवळण महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर मात्र त्या सर्व गावांमध्ये अचानक बदलाचे वारे वाहण्यास सुरूवात झाली आहे. अनेकांना विकासाची स्वप्ने पडू लागली आहेत. इतके दिवस विकासापासून लांब राहिलेले आपले गाव महामार्गाशी जोडले गेल्याने झपाट्याने प्रगती करेल. नवीन उद्योग-व्यवसाय सुरू झाल्याने रोजगाराच्या संधी वाढतील, अशी आशा सर्वांना वाटू लागली आहे. दरम्यान, रिअल इस्टेट क्षेत्रातील काही विकसकांनी शहरालगतच्या या गावांमध्ये मोक्याच्या जमिनींची पाहणी करण्यास सुरूवातही केली आहे. जळगाव शहराच्या तुलनेत काही प्रमाणात स्वस्त असलेल्या या भागातील जमिनी गुंतवणुकदारांना आकर्षित करत आहेत.

बाह्यवळण महामार्गामुळे उत्तर दिशेला जळगाव शहर विकसित होण्यास आता चालना मिळणार आहे. अशा परिस्थितीत त्या दिशेला असलेल्या शहरालगतच्या सर्व गावांनी भविष्याचा विचार करून विकास आराखड्याचे व्यवस्थित नियोजन करावे. -आयुष प्रसाद (जिल्हाधिकारी, जळगाव)