नाशिक : जिल्ह्यात मुंबई-आग्रा महामार्गाने इंदूरहून मुंबईकडे निघालेल्या राज रतन ट्रॅव्हल्स कंपनीच्या खासगी बसचे सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील चांदवडजवळ टायर फुटले. यामुळे बसने पेट घेतला. हा प्रकार चालकाच्या वेळीच लक्षात आल्याने तातडीने प्रवाशांना खाली उतरविण्यात आले. त्यामुळे या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. बसमधील सर्व २९ प्रवासी सुखरूप असून एका महिला प्रवाशाला किरकोळ खरचटले आहे.
मध्य प्रदेशातील इंदूर येथून राज रतन ट्रॅव्हलची खासगी बस २९ प्रवाशांना घेऊन मुंबईच्या दिशेने निघाली होती. सोमवारी पहाटे नाशिक जिल्ह्यातील चांदवडजवळील आडगावटप्पा या शिवारात मंगरुळ टोल नाक्याच्या पुढे बस आली असता टायर फुटले. आणि कळण्याच्या आत बसने पेट घेतला. बसने पेट घेतल्याने प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. चालकाने अशा परिस्थितीत प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले. प्रवासी बसमधून संकटकालीन मार्गासह नेहमीच्या दरवाजातून बाहेर पडू लागले. बसमधील सर्वच प्रवासी सुखरूप बाहेर पडले. परंतु, या गडबडीत प्रवाशांना आपले सामान बरोबर घेण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे आगीत प्रवाशांचे सामान जळून खाक झाले. बसमधील एका महिला प्रवाशाला थोडे खरचटले.
टोलनाका कर्मचाऱ्यांनी या प्रकाराची माहिती दिल्यानंतर सोमा कंपनीच्या अग्निशमन कर्मचाऱ्यांनी आग विझवली.
चांदवड पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी इतर कर्मचाऱ्यांसह घटनास्थळाची पाहणी केली. मदतकार्यात सहभाग घेत प्रवाशांना पुढील प्रवासासाठी कसे मार्गस्थ करता येईल, या अनुषंगाने नियोजन करण्यात आले. सर्व प्रवाशांना दुसऱ्या खासगी ट्रॅव्हल संस्थेच्या बसमधून मुंबईकडे पाठविण्यात आले. चांदवड पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात जळीताची नोंद करण्यात आली. पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण तपास करण्यात येत आहे. पोलीस निरीक्षक वाघ यांनी खासगी कंपनीची बस होती,अशी माहिती दिली. बसमध्ये २९ प्रवासी होते. टायर फुटल्याने हा अपघात झाला. मात्र कुठलीही जीवितहानी झाली नाही. अपघातग्रस्त वाहन बाजूला घेतल्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करुन देण्यात आल्याचे वाघ यांनी नमूद केले.
टायर फुटण्याची कारणे ?
बऱ्याचदा खासगी असो वा राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचा अपघात हा टायर फुटल्यामुळे होतो. टायर फुटण्याची अनेक कारणे असतात. तापमान, बसच्या आसन क्षमतेपेक्षा जास्त भार, टाय मध्ये कमी हवा, हवेचा दाब, टायर खराब असणे तसेच रस्त्याची दुरावस्था. चांदवड प्रकरणात टायर नेमके कशामुळे फुटले, हे प्रादेशिक परिवहन तसेच पोलिसांकडून तपासण्यात येणार आहे.