करोना संकटामुळे प्रदीर्घ काळ बंद राहिलेले मालेगाव येथील यंत्रमाग कारखाने सुरू झाले असले तरी या व्यवसायावर अवलंबून असलेल्या हजारो कामगारांच्या अडचणी कायम आहेत. कापडास उठाव नसल्याने सुरू झालेले कारखाने दोन, तीन दिवस चालतात. कामगारांना तेवढेच काम मिळते. निम्मे कारखाने अद्याप सुरूच झालेले नाहीत. टाळेबंदीच्या काळात वेतन न मिळाल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या. ज्या कारखान्याबद्दल तक्रारी झाल्या, त्या मालकांनी ते सुरू केले नसल्याचे कामगार संघटनांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, या तक्रारीत तथ्य नसल्याचे मालेगाव यंत्रमाग उद्योग विकास समितीने म्हटले आहे. फेब्रुवारी, मार्चमध्ये विकलेल्या मालाचे पैसे अद्याप मिळालेले नाही. कपडय़ांची मागणी ओसरलेली आहे. गुजरात बाजार बंद असल्याकडे समितीने लक्ष वेधले.
करोनाच्या टाळेबंदीत जवळपास ६५ दिवस मालेगावमधील यंत्रमागांचा थांबलेला खडखडाट प्रतिबंधित क्षेत्रवगळता काही दिवसांपूर्वी सुरू झाला. परंतु, प्रतिबंधित क्षेत्राबाहेर असणारे काही कारखाने आजही बंद असल्याचा कामगारांचा आक्षेप आहे. मालेगावमध्ये जवळपास तीन लाख यंत्रमाग असून छोटे, मोठे २० हजार कारखाने आहेत. शहराचा आर्थिक कणा असलेल्या या व्यवसायावर सुमारे चार लाख लोकसंख्या अवलंबून आहे. कारखाने बंद असल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली. टाळेबंदीच्या काळात कामगारांना वेतन देण्याचे शासनाचे आदेश होते. परंतु, अनेक कारखाना मालकांनी कामगारांना वेतन देण्यात कुचराई केली. यंत्रमाग सुरू करण्यास परवानगी मिळूनही केवळ निम्मे कारखाने सुरू होऊ शकले. त्यांच्याकडून कामगारांना आठवडय़ातून तीन दिवस काम दिले जाते. सर्वसाधारण स्थितीत आठवडाभराच्या कामाचे कामगारास अडीच ते तीन हजार रुपये मिळतात. तीन दिवसांच्या कामातून केवळ १२०० ते १३०० रुपये हाती पडले. यात घरखर्च चालविणे अवघड झाल्याचे कामगार संघटनेचे पदाधिकारी अल्ताफ शेख यांनी सांगितले.
अद्याप सुरू न झालेल्या कारखान्यांतील कामगारांची त्याहून बिकट स्थिती आहे. त्यांना काम आणि वेतनदेखील मिळालेले नाही. टाळेबंदीत वेतन मिळाले नसल्याच्या तक्रारी संबंधितांनी केल्या होत्या. प्रशासनाने निर्देश देऊनही वेतन दिले गेले नाही. तक्रारी करणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी मालकांनी कारखाने बंद ठेवण्याचे धोरण अवलंबिल्याची तक्रार कामगार संघटना करत आहे. तक्रारी करणाऱ्यांना कामावर घेतले जात नाही. ही बाब यंत्रणांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. कारखाना मालक आदेशाचे पालन करत नसल्याने गंभीर स्थिती निर्माण झाल्याकडे ‘सिटू’चे प्रमुख डॉ. डी. एल. कराड यांनी लक्ष वेधले. या संदर्भात कामगार अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांनी मालेगावमध्ये कामगारांसाठी तक्रार निवारण कक्ष स्थापन केल्याचे नमूद केले. प्राप्त झालेल्या तक्रारींनुसार कारखाना मालकांशी संपर्क साधून तक्रारींचे निराकरण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. कारखाना मालकांसमोर वेगळ्याच अडचणी आहेत. सध्याच्या खरेदीत कपडे प्राधान्यक्रमाच्या यादीत नाही. तयार मालास उठाव नाही. ही परिस्थिती बदलण्यास आणखी काही काळ जावा लागणार असल्याचे दिसत आहे.
मालेगावमधील अनेक कारखाने बंद असण्यामागे आणि जे सुरू आहेत ते तीन दिवस चालण्याची अनेक कारणे आहेत. गुजरातमधील कापड बाजार बंद आहे. नवीन माल जात नाही. फेब्रुवारी, मार्चमध्ये दिलेल्या मालाचे पैसे अद्याप मिळालेले नाही. कच्चा माल घ्यायला पैसे लागतात. सध्या माल तयार केला तरी विकला जात नाही. गुजरातच्या प्रक्रिया उद्योगातील परप्रांतीय मजूर मूळगावी गेले आहेत. त्यामुळे तेथे मनुष्यबळाचा प्रश्न आहे. सुती कपडय़ास अल्पशी मागणी आहे. गरजेपुरताच माल घेतला जातो. ग्राहकांनी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीला प्राधान्य दिले आहे. कपडय़ांची खरेदी नंतर होईल असा त्यांचा कल आहे. याचा परिणाम मालेगावमधील यंत्रमाग कारखान्यांवर झाला. या स्थितीत अनेक कारखाने कामगारांना घरखर्च चालविण्याइतपत उत्पन्न मिळेल, असे काम उपलब्ध करीत आहेत.
-खलीद मोईन, सहसचिव, मालेगाव यंत्रमाग उद्योग विकास समिती