मालेगाव : बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर गोवंशाची हत्या आणि तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध मालेगाव पोलिसांनी सक्त कारवाई सुरू केली आहे. दहा वर्षात गोवंश हत्या प्रतिबंध कायद्यान्वये दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असणाऱ्यांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत असून वारंवार गुन्हे करणाऱ्यांना तडीपार करण्याचे धोरण पोलिसांतर्फे अवलंबण्यात आले आहे. त्यानुसार आतापर्यंत चार जणांना तडीपार करण्यासाठीचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.
याबाबतची माहिती सहायक पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांनी दिली. जिल्हा अधीक्षक विक्रम देशमाने आणि अप्पर अधीक्षक तेजबिरसिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली गोवंश हत्या व तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी मालेगाव पोलिसांकडून कठोर उपाय योजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्यानुसार २०१५ पासून मालेगाव शहर व तालुका भागात गोवंश हत्या प्रतिबंध कायद्यान्वये दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल असणाऱ्या गुन्हेगारांची माहिती संकलित करण्यात आली. त्यानुसार ८२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून ९३ जणांविरुध्द अशी कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. गोवंश कायद्याचे वारंवार उल्लंघन केल्याचे आढळून आल्याने फारुख खान, सईद खान, आसिफ खान, शेख जहांगीर या चौघांना तडीपार करण्याचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. अशाच प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आणखी काही जणांच्या तडीपारीसाठी प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे.
कत्तलीसाठी गोवंशाची तस्करी करणाऱ्यांविरुद्ध मालेगाव पोलिसांनी दीड महिन्यात १६ कारवाया केल्या आहेत. त्यात १४९ जनावरे व एक कोटी सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गोवंश संरक्षणासाठी मालेगाव पोलिसांनी विशेष पथक स्थापन केले आहे. बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर गोवंश हत्या होऊ नये म्हणून पोलिसांतर्फे विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. त्यासाठी शहरातील लोकांच्या ताब्यात असलेले गोवंश पाळीव आहेत की कत्तलीसाठी याचा नेमका उलगडा होण्यासाठी गृहभेटी देऊन तपासणी करण्यात येणार आहे. आताच्या तपासणीत पाळीव गोवंश असल्याचे सांगणाऱ्या पशु मालकांच्या ताब्यात बकरी ईदनंतर सदर गोवंश आढळून न आल्यास त्याची कत्तल झाल्याची शक्यता गृहीत धरून चौकशी करण्यात येईल. तसे पुरावे मिळाल्यावर संबंधित पशु मालकांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा सहायक अधीक्षक गुंजाळ यांनी दिला आहे.