धुळे – प्रलंबित मागण्यांसाठी तसेच संघटनेचे कमांडर राऊत यांच्या अटकेच्या निषेधार्थ इपीएस- ९५ निवृत्त कर्मचारी समन्वय संघटनेच्या वतीने गुरुवारी येथे क्युमाईन क्लबसमोर उपोषण करण्यात आले. प्रलंबित मागण्यांची केंद्र सरकार दखल घेत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला.यावेळी धुळे जिल्हा व उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष देवीसिंग जाधव यांनी भूमिका मांडली. सात वर्षापासून लढा देत असूनही सरकार ज्येष्ठ नागरिकांना न्याय द्यायला तयार नाही.

कमीतकमी साडेसात हजार रुपये निवृत्तीवेतन मिळावे, महागाई भत्ता द्यावा, निवृत्तीधारकासह त्याच्या पत्नीला मोफत आरोग्य सुविधा द्याव्यात, निवृत्तीवेतन योजनेत समाविष्ट नसणाऱ्यांनाही सामाजिक सुरक्षा म्हणून पाच हजार रुपये व महागाई भत्ता द्यावा, अशा मागण्या जाधव यांनी केल्या आहेत. सरकार झोपी गेल्याचे सोंग करीत आहे. या ढोंग करणार्‍या सरकारला जागे करण्यासाठी आणि कमांडर राऊत यांच्या अटकेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले आहे, असे जाधव यांनी सांगितले. आंदोलनात जे. आर. सूर्यवंशी, एम. आर. पाटील, व्ही. एस. देवकाते, सुदर्शन जैन, डी. के. जाधव आदी सहभागी झाले होते.