प्रदीर्घ काळ रखडलेला नाशिक-पुणे जलद दुहेरी रेल्वे मार्ग प्रकल्प वेळेत प्रत्यक्षात आल्यास दोन्ही औद्योगिक शहरांना जोडणारा किफायतशीर पर्याय उपलब्ध होणार आहे. रस्ते वाहतुकीच्या तुलनेत रेल्वेने माल वाहतूक स्वस्त असते. त्याचा लाभ उद्योगांसोबत कृषिमाल, वाइनसह सर्वच घटकांना होईल. दक्षिण भारताशी नाशिकचा संपर्क विस्तारणार आहे. नाशिक-पुणे रस्त्याचे चौपदरीकरण प्रगतिपथावर असले तरी काही टप्प्यांत ते काम रखडलेले आहे. राजगुरू ते पुणे दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी असते. नाशिक-पुणे रेल्वे मार्गामुळे त्यातून प्रवाशांची सुटका होऊ शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महारेलच्यावतीने पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प चार वर्षांत पूर्ण करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे. नाशिक-पुणे रेल्वे मार्गाचे घोंगडे बराच काळ भिजत पडले आहे. अंदाजपत्रकात रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी तरतूद होण्यापुरताच तो आजवर मर्यादित राहिला. या मार्गासाठी अनेकदा सर्वेक्षण झाले. अहवाल सादर झाले. परंतु रेल्वे मार्गाची गाडी काही पुढे सरकत नव्हती. नाशिक, पुणे वाहन उद्योगांचे केंद्रबिंदू. दोन्ही भागांत कृषी उत्पादन विपुल प्रमाणात होते. अन्नप्रक्रिया उद्योगांचे मोठे जाळे आहे. या शहरांना रेल्वेने जोडण्यासाठी उद्योजकीय संस्था, संघटना, लोकप्रतिनिधी आणि प्रवासी संघटना पाठपुरावा करत होते. जलद रेल्वे प्रकल्प नाशिक, पुण्याप्रमाणे अहमदनगरसाठी तितकाच उपयुक्त ठरणार आहे. याद्वारे नाशिक-पुणे हे अंतर पावणेदोन तासात कापले जाईल. सध्या या रेल्वे प्रवासासाठी जवळपास सहा तास लागतात. प्रवाशांच्या आग्रहास्तव काही वर्षांपूर्वी रेल्वेने नाशिक-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस ही गाडी सुरू केली. ती गाडी कल्याण, पनवेल, कर्जतमार्गे ये-जा करते. या प्रवासाला बराच वेळ लागत असल्याने तिला फारसा प्रतिसाद मिळत नाही. उलट या रेल्वेचा पुण्याऐवजी मुंबई तसेच पनवेल गाठण्यासाठी आधिक्याने वापर केला जातो. थेट रेल्वे मार्गामुळे सध्याचा कंटाळवाणा रेल्वे प्रवास संपुष्टात येईल.

२३५ किलोमीटर लांबीचा दुहेरी मार्ग नाशिक, अहमदनगर, पुणे जिल्ह्य़ातून जाणार आहे. नाशिक, सिन्नर, संगमनेर, जुन्नर, आंबेगाव, खेड, हवेली या तालुक्यात भूसंपादन केले जाणार आहे. यासाठी विशेष भूसंपादन अधिकारी नियुक्त करण्याची सूचना महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशन अर्थात महारेलने जिल्हा प्रशासनास केली आहे. या मार्गामुळे दुष्काळी भागाचा विकास आणि स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना मिळणार असल्याचे रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य राजेश फोकणे यांनी सांगितले. भूसंपादनाच्या प्रचलित कायद्यानुसार चांगले पैसे मिळतात. समृद्धी महामार्गाचे उदाहरण समोर आहे. यामुळे रेल्वे मार्गासाठी ही प्रक्रिया सहजपणे पार पडेल. युद्धपातळीवर हे काम सुरू व्हायला हवे, असे फोकणे यांचे म्हणणे आहे. नाशिकहून कांदा, द्राक्षासह अन्य कृषिमाल देशाच्या कानाकोपऱ्यात पाठविला जातो. रस्ते मार्गाऐवजी रेल्वेची माल वाहतूक किफायतशीर असते. पुणे रेल्वे स्थानक दक्षिणेकडील भागांशी जोडले आहे. त्याचाही लाभ नाशिकला मिळणार असल्याचे व्यापारी आणि व्यावसायिक सांगतात.

पुणे आणि नाशिक ही दोन शहरे औद्योगिक, कृषी विकासात अव्वल आहेत. या दोन स्मार्ट सिटीला जोडण्यासाठी ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प’ उपयुक्त ठरणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्य़ातील पर्यटन, शिक्षण, शेती, व्यवसाय, उद्योगक्षेत्रांच्या विकासाला गती मिळणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे-नाशिक हे अंतर अवघ्या पावणेदोन तासांत हे अंतर कापले जाणार आहे. त्याचबरोबर सध्याच्या भूसंपादनाच्या प्रचलित कायद्याप्रमाणे बाधित शेतकऱ्यांना मोबदला दिला जाणार आहे.

२३५ किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग

* पुणे जिल्हा – ११३ किमी, नाशिक – ६४ किमी,

नगर – ५८ किमी.

* रेल्वेचा वेग २०० किलोमीटर प्रति तास. पुढे हा वेग २५० कि.मी.पर्यंत वाढविणार.

* पुणे-नाशिक अंतर अवघ्या पावणेदोन तासात कापणार.

* पुणे-नाशिक दरम्यान २४ स्थानकांची आखणी.

* १८ बोगदे, ४१ उड्डाणपूल, १२८ भुयारी मार्ग प्रस्तावित.

* सुरुवातीला गाडीला सहा डबे असतील.

भविष्यात १२ ते १६ पर्यंत संख्या वाढविता येईल

* पुणे शहरातील रेल्वे स्थानकापासून हडपसपर्यंत उन्नत मार्ग, पुढे नाशिकपर्यंत रेल्वेचे रूळ जमिनीला समांतर

* सुमारे दीड हजार हेक्टर्स जमिनीचे संपादन करावे लागणार

कोणत्या तालुक्यांतून नियोजित रेल्वे मार्ग जाणार ?

* पुणे जिल्हा – हवेली, खेड, आंबेगाव, जुन्नर

* नगर जिल्हा – संगमनेर

* नाशिक जिल्हा – नाशिक आणि सिन्नर

नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा केला जात आहे. या रेल्वे मार्गाने चाकण, सिन्नर ही औद्योगिक क्षेत्रे जोडली जातील. स्वस्तात औद्योगिक माल वाहतुकीची प्रदूषणमुक्त व्यवस्था उपलब्ध होईल. नाशिकच्या वाइन उद्योगाचे महत्त्व वाढेल. कृषिमाल वाहतुकीला त्याचा लाभ होणार आहे. नाशिकला दक्षिण भारताशी जोडण्यासाठी हा मार्ग महत्त्वपूर्ण ठरणार आहे. दुष्काळी सिन्नर, संगमनेर, चाकणपर्यंतच्या भागाचा विकास होईल.

– अभय कुलकर्णी, नाशिक फर्स्ट

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune nashik railway line is completed on time it will give impetus to development abn
First published on: 06-08-2020 at 00:23 IST