नाशिक : राज्याचे जलसंपदामंत्री अहिल्यानगरचे आहेत. त्यामुळे नदीजोड प्रकल्पाची कार्यालये नाशिकमध्ये नेण्यात येत आहे. मुळात नदी जोड प्रकल्पातील पाणी मराठवाड्याला मिळणार आहे. गोदावरी खोऱ्यात वरील भागात केवळ सर्वेक्षणाचे काम होईल. त्याची अंमलबजावणी मराठवाड्यात करायची आहे. त्यामुळे मुख्य अभियंता, नदी जोड प्रकल्प, नाशिक हे कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे स्थलांतरीत करण्याची मागणी आता पुढे आली आहे.

ऑगस्टच्या प्रारंभी सिंचन भवन येथे उल्हास वैतरणा नदी जोड प्रकल्प कार्यालयाचे उद्घाटन जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे यांच्यासह अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील आमदारांच्या उपस्थितीत झाले होते. हे संगमनेर येथील कार्यकारी अभियंता लघू पाटबंधारे विभागाचे नाशिकमध्ये स्थलांतरीत झालेले कार्यालय आहे. त्यांच्यावर पश्चिमी वाहिनी उपखोऱ्यातील अतिरिक्त पाणी वळविण्याची अनुषंगिक कामे सोपविली जातील. सिंचन भवनमध्ये राज्यातील नदी जोड प्रकल्पाचे समन्वयक (मुख्य अभियंता) हे कार्यालय आधीपासून अस्तित्वात आहे. जलसंपदाच्या उत्तर महाराष्ट्र प्रदेशचे ( नाशिक) मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ यांच्याकडे नदी जोड प्रकल्पाचे समन्वयक म्हणून अतिरिक्त जबाबदारी आहे. नदी जोड प्रकल्पातून भविष्यात उपलब्ध होणाऱ्या पाण्याची पळवापळवी आतापासून सुरू झाल्याचे आरोप होत असताना आता नदी जोडच्या नाशिकमधील कार्यालयांवर मराठवाड्यातून आक्षेप घेतला जात आहे.

मराठवाड्याची तूट भरून काढण्यासाठी शासनाने २०१९ मध्ये पश्चिमी वाहिनी खोऱ्यातून (कोकण) १६८.७५ टीएमसी पाण्यापैकी १५५ टीएमसी पाणी मराठवाड्यासाठी मंजूर केल्याकडे मराठवाडा जलसमुद्धी प्रतिष्ठानने लक्ष वेधले. यासाठी मुख्य अभियंता नदीजोड प्रकल्प, नाशिक हे नदीजोड प्रकल्प कार्यालय मराठवाड्यासाठी असल्याने ते छत्रपती संभाजीनगर येथे स्थलांतरीत करावे, जेणेकरून प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी प्रशासकीय दृष्टीने ते सोयीचे ठरेल, असा दावा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. शंकरराव नागरे यांनी केला. सर्वेक्षण व तत्सम कामे करणारी काही कार्यालये नाशिकमध्ये ठेवण्यास विरोध नाही. परंतु, नदीजोड प्रकल्पाचे पाणी मराठवाड्यात द्यावयाचे असल्याने अंमलबजावणीसाठी या प्रकल्पाचे मुख्य अभियंता कार्यालय संभाजीनगरमध्ये असायला हवे, असे प्रति्ष्ठानचे म्हणणे आहे. जलसंपदामंत्री विखे पाटील हे त्या भागातील असल्याने हे कार्यालय नाशिकमध्ये ठेवण्यात आले. यामुळे मराठवाड्यावर अन्याय झाल्याची तक्रार त्यांनी केली.

कार्यालयासाठी नाशिक योग्य

नाशिकमधील नदीजोड प्रकल्पाचे (समन्वयक) मुख्य अभियंता हे कार्यालय संपूर्ण राज्यातील नदी जोड प्रकल्पांसाठी काम करते. सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे, कामातील अडचणी दूर करण्यासाठी या कार्यालयामार्फत प्रयत्न केले जातात. नदी जोड प्रकल्पाच्या अंमलबजावणीची जबाबदारी त्या, त्या भागातील मुख्य अभियंत्यांवर आहे. मराठवाड्यातून होणाऱ्या कार्यालय स्थलांतराची मागणी तार्किकदृष्ट्या योग्य नाही. नदी जोड प्रकल्पांसाठी कोकण, ठाणे, नाशिक भागात जमिनीवर काम करायचे आहे. त्यामुळे या क्षेत्राजवळ मुख्य अभियंता नदी जोड प्रकल्पाचे कार्यालय असणे अधिक योग्य असल्याचा दावा जलसंपदा विभागाकडून केला जातो.