नाशिक : पंचवटीतील नांदूर नाका येथे किरकोळ वादातून टोळक्याने केलेल्या बेदम मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या राहुल धोत्रे या युवकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे हे या प्रकरणातील संशयित आहेत. मृत युवकाचे कुटुंंबिय, नातेवाईकांसह स्थानिकांनी पोलीस आयुक्तालयात धाव घेत माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना अटक करण्याची मागणी केली.
दूर नाका परिसरात २२ ऑगस्ट रोजी मारहाणीची घटना घडली होती. निमसे यांच्या मुलांशी सनी धोत्रे या युवकाचे किरकोळ वाद झाले होते. त्यानंतर काही वेळात भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांनी तक्रारदार आकाश धोत्रेला दमदाटी करत जमावाला चिथावणी दिली. नंतर १० ते १५ जणांच्या टोळक्याने पाठलाग करत लाकडी दांडके, हत्यारांनी अजय कुसाळकर (२७) आणि तक्रारदाराचा भाऊ राहुल धोत्रे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. चॉपरचा वापर करण्यात आला. यात राहुल धोत्रे आणि अजय कुसाळकर हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात उद्धव निमसे यांच्यासह मेघराज जोजारे, गणेश निमसे, रोशन जगताप, अक्षय पगार, सुधीर उर्फ गोटीराम निमसे, पवन निमसे, संतोष मते, सचिन दिंडे, स्वप्नील बागूल, सुमित हांडोरे आणि अन्य संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पाच जणांना पोलिसांनी अटक केली.
शुक्रवारी सकाळी जखमी राहुल धोत्रे या युवकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे आधीच्या गुन्ह्यात हत्येचे कलम समाविष्ट केले जाणार आहे. राहुल यांच्या मृत्युनंतर कुटुंबियांनी नातेवाईक व स्थानिक नागरिकांसह पोलीस आयुक्तालयात धाव घेतली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. धोत्रे कुटुंबियांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. उद्धव निमसे यांना तत्काळ अटक करून कठोर कारवाईची मागणी केली. माजी नगरसेवक निमसे फरार आहेत. फरार संशयितांना अटक करण्यासाठी दोन पथके रवाना करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
उद्धव निमसेंना अटक का नाही ?
युवकांवर प्राणघातक हल्ल्यात भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांचा सहभाग स्पष्टपणे दिसत असतानाही ठोस कारवाई झाली नसल्याचा मुद्दा अलीकडेच शिवसेनेने (उध्दव ठाकरे) पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात उपस्थित केला होता. निमसे यांच्यावर कारवाई न होण्यामागे यंत्रणेवर राजकीय दबाव असल्याचे दिसून येते. तक्रारदाराच्या कुटुंबावर सध्या राजकीय आणि गुंडांचा दबाव टाकला जात असल्याकडे ठाकरे गटाने लक्ष वेधले होते. ही घटना अतिशय गंभीर असून लोकप्रतिनिधी राहिलेली व्यक्ती स्वत: हल्ल्यात सहभागी होणे हा लोकशाही व्यवस्थेवर आघात आहे. अशा प्रकारे गुन्हेगारांना आश्रय देणे आणि सामान्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणे असह्य असल्याचे ठाकरे गटाने म्हटले होते. माजी नगरसेवक निमसेंना तातडीने अटक करून आडगाव व परिसरात नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी करण्यात आली.