नााशिक : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभू्मीवर, पंचवटीतील नांदूर नाका येथील राहुल धोत्रे या युवकाच्या मृत्युचे प्रकरण भाजपसाठी अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे. किरकोळ वादातून टोळक्याने केलेल्या बेदम मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या राहुल धोत्रे या युवकाचा घटनेनंतर पाच दिवसांनी रुग्णालयात मृत्यू झाल्यावर या प्रकरणाशी संबंधित संशयित भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे फरार झाले. निमसे हे पोलिसांच्या हाती न लागल्याने धोत्रे कुटूंबिय आणि त्यांच्या समर्थकांमध्ये रोष निर्माण झाला असून या प्रकरणाचा राजकीय फायदा कसा घेता येईल, याकडे विरोधकांचे लक्ष आहे.
नांदूर नाका परिसरात २२ ऑगस्ट रोजी भाजपचे माजी नगरसेवक उध्दव निमसे यांच्या मुलांशी सनी धोत्रे या युवकाचे किरकोळ वाद झाले होते. त्यानंतर उद्धव निमसे समर्थकांनी केलेल्या हल्ल्यात दोघांना मारहाण करण्यात आली होती. घटनेच्या पाचव्या दिवशी हल्ल्यात जखमी राहुल धोत्रे या युवकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे नातेवाईक आणि इतरांनी पोलीस आयुक्तालयात धाव घेतली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उद्धव निमसे यांना अटक केल्याशिवाय राहुल धोत्रे याचा मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. अखेर, पोलिसांच्या आश्वासनानंतर मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईक तयार झाले.
या घटनेतील प्रमुख संशयित भाजपचे माजी नगरसेवक उध्दव निमसे हे अजूनही पोलिसांना सापडलेले नाहीत. नांदूर नाका परिसरात निमसे यांचा दबदबा आहे. उध्दव निमसे हे भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी पंचवटीत काँग्रेसचा प्रमुख आधार होते. काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी म्हणून त्यांनी नांदूर नाका परिसरात जाळे निर्माण केले होते. परंतु, काँग्रेसच्या लोकप्रियतेस गळती लागून भाजपमध्ये सर्वांचाच प्रवेश सुरु झाल्यावर उध्दव निमसे यांनीही भाजपच्या बोटीत उडी मारली. तीनवेळा नगरसेवक आणि एकदा स्थायी समिती सभापतीपद उपभोगलेले उध्दव निमसे हे परिसरातील इतर विरोधकांपेक्षा आर्थिकदृष्ट्या कितीतरी पटीने तुल्यबळअसल्याने साम-दाम-दंड अशी त्रिसूत्री वापरत त्यांनी आपला दरारा अधिक वाढेल, याची काळजी घेतली.
आगामी महापालिका निवडणुकीसाठी उध्दव निमसे म्हणजे या भागात यश मिळवून देण्यासाठी हुकमी एक्का यादृष्टीने भाजपकडून त्यांच्याकडे पाहिले जात असताना ते हत्या प्रकरणात अडकल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. उध्दव निमसे यांच्याविरोधात शिवसेनेने (उध्दव ठाकरे) आधीच आघाडी उघडली असल्याने त्यांना अटक झाल्यास ठाकरे गट त्याचा राजकीय फायदा घेण्याचा नक्कीच प्रयत्न करणार. त्यामुळे या हत्या प्रकरणास राजकीयदृष्ट्या महत्व प्राप्त झाले असून धोत्रे कुटुंबिय आणि त्यांच्या बाजून उभी राहिलेली वंचित बहुजन आघाडी यांनी निमसे यांच्या अटकेसाठी दबाव वाढविला आहे.