लोकसत्ता वार्ताहर
मनमाड : शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कोसळलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरची सर्व प्रकारची वाहतूक पूर्ववत सुरू झाली. त्यामुळे राज्यातील वाहतूकदारांची मोठी समस्या मिटली असून राज्य परिवहन महामंडळाच्या मनमाड आगारातून पूर्वीप्रमाणे नियमित सर्व बस धावू लागल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
मनमाड आगारातून पुणेसह नगर, शिर्डीकडील सर्व वाहतूक आणि एसटीच्या फेऱ्या पूर्वीप्रमाणे नियमित सुरू झाल्या. तसेच उत्तर महाराष्ट्रातून प्रामुख्याने नंदुरबार, शहादा, चोपडा, अमळनेर, धुळे, मालेगाव येथून शिर्डी, नगर, पुणे, पंढरपूर, सोलापूर आदी ठिकाणी जाणाऱ्या सर्व बस मनमाडमार्गे धावू लागल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठी सुविधा झाली आहे. मनमाड येथून पुणे मार्गावर धावणाऱ्या मनमाड आगाराच्या सर्व बस पूर्वीप्रमाणे मार्गस्थ झाल्या. नंदुरबार येथून पंढरपूरला जाणारी बससेवा, धुळे येथून पुणे, नगर, सोलापूरकडे, मालेगाव, शिर्डी तसेच इतर सर्व बसफेऱ्या नियमित सुरू झाल्या आहेत. प्रवाशांनी एसटीच्या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आगार व्यवस्थापक विक्रम नागरे यांनी केले.
आणखी वाचा-नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा निम्म्यावर
मार्ग बंद असल्याने राज्यातील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. या पुलाचे महत्त्व ओळखून आमदार सुहास कांदे यांनी शासनाकडून दुरुस्तीसाठी तीन कोटी रुपये मंजूर करून आणले आणि हे काम युद्ध पातळीवर पूर्ण करण्यात आले.
एसटी, इंधन टँकरला सर्वाधिक झळ
रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्यामुळे मनमाड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील सर्व वाहनांची समस्या मिटली आहे. मनमाड शहरातून इंदूर-पुणे हा राष्ट्रीय महामार्ग जातो. या महामार्गावर वाहतुकीसाठी हा पूल अतिशय महत्वाचा आहे. पुलाचा कठडा २९ नोव्हेंबर २०२३ रोजी कोसळला होता. त्यामुळे या मार्गावरची सर्व प्रकारची वाहतूक दोन महिन्यांपासून बंद करून ती अन्य मार्गाने वळवण्यात आली होती. त्यामुळे वाहनधारकांना मोठा फेरा मारून जावे लागत होते. इंधन आणि वेळेचा अपव्यय होत होता. सर्वाधिक फटका वाहतूक व्यवसायाबरोबर पानेवाडीतील कंपन्यातून इंधन भरून जाणारे टँकर आणि राज्य परिवहन महामंडळाच्या मनमाड बस आगाराला बसला.