वातावरणात गारठा, सकाळपासून सूर्यदर्शन नाही, द्राक्ष मण्यांना तडे जाण्याची शक्यता

नाशिक : ऐन हिवाळय़ात दिवसभर अवकाळी पावसाची रिमझिम सुरू असल्याने शेतकरी वर्गाची चिंता वाढली असून या प्रतिकूल हवामानाचा थेट परिणाम द्राक्षे, कांदे, भाजीपाला पिकांवर होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील अनेक भागात सध्या द्राक्षबागा फलधारणा अवस्थेत आहेत. पावसामुळे द्राक्ष घड कुजण्याची होण्याची धास्ती आहे. सटाणा परिसरात जिथे बागा तयार झाल्या आहेत, तिथे द्राक्ष मण्यांना तडे जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मध्यंतरी वातावरणातील बदलानंतर थंडीचे पुनरागमन होत असताना अकस्मात पावसाळी स्थिती निर्माण झाली. बुधवारी जिल्ह्यातील बहुतांश भागात सूर्यदर्शनही झाले नाही. सकाळपासून दिवसभर हलक्या ते मध्यम  स्वरूपाच्या सरी कोसळल्या. सिन्नर, त्र्यंबकेश्वर, चांदवड, निफाड, मालेगाव, सटाणा, नांदगाव, दिंडोरी, नाशिक अशा जवळपास सर्वच भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस सायंकाळी उशिरापर्यंत सुरु राहिला.

या वातावरणाचा परिणाम द्राक्षासह कांदा आणि भाजीपाला पिकांवर होण्याची शक्यता आहे. नवीन कांदा बाजारपेठेत येत असून जुना कांदा अजूनही चाळीत आहे. चांगल्या पावसामुळे यंदा भाजीपाला जोमात येत असतानच वातावरण पूर्ण बदलल्याने शेतकरी हैराण झाला आहे.  दोन वर्षांपासून करोना प्रादुर्भावामुळे पिकांवर झालेला खर्चही निघत नसल्याने यावर्षी तरी मागील पिकांचे झालेले नुकसान भरून निघेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाचे पूर्ण नियोजन केले.

दरम्यान सततच्या हवामान बदलाने आणि ढगाळ वातावरणामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार औषधांची फवारणी करावी लागत असून खर्च वाढत आहे. कांदे, भेंडी, कारली, दोडका, पालेभाज्या आदी पिके घेण्यास शेतकरी पसंती देतो. परंतु, प्रतिकूल हवामानाचा या पिकांवर देखील परिणाम होऊ लागला आहे. त्यातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी सांगितले.

दिवसभरातील पाऊस (सकाळी सात ते पाच वाजेपर्यंत)

त्र्यंबकेश्वर १६ मिलीमीटर, वेळूंजे २५, हरसूल १५, देवळा १५, उमराणे १७, लोहणेर पाच, सटाणा १३, मुल्हेर १२, जायखेडा १९, पेठ १७, जोगमोडी २३, कोहोर २१ मिलीमीटर

द्राक्षांवर रोगराईचा धोका

पावसाळा लांबल्याने यंदा द्राक्षबागांचा हंगाम लांबणीवर पडला होता. बागांची छाटणीही उशिरा झाली. हिवाळय़ातही पाऊस द्राक्ष बागांसमोर अडचणी निर्माण करणारा ठरत आहे. सटाणा, देवळा आणि आसपासच्या भागात द्राक्षबागा तयार झालेल्या आहेत. तिथे परिपक्व द्राक्ष मण्यांना तडे जाऊ शकतात. इतर भागातील बहुतांश द्राक्ष बागा फलधारणेच्या अवस्थेत आहेत. पावसामुळे लहान मणी असलेले घड कुजण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बागांवर डावण्या, भुरी, करपा अशा रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करतात. प्रत्येक वेळी पाऊस हजेरी लावून निघून जातो. तेव्हा फवारणीद्वारे रोगराईपासून बचाव करण्याची संधी असते. सध्याच्या वातावरणात तशी संधी मिळणार नसल्याकडे उत्पादक लक्ष वेधत आहेत.

बदलत्या वातावरणाने आजारांना निमंत्रण

सकाळपासून सुरु झालेल्या संततधारेने जनजीवन विस्कळीत झाले. वातावरणात कमालीचा गारठा पसरला.  बाजारपेठेतही शुकशुकाट दिसत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले, दिवसभर नागरिकांना गरम कपडय़ांचा आधार घ्यावा लागला. सध्याचे वातावरण आजारांना आमंत्रण देणारे ठरणार आहे.