नाशिक – मुंबईतील मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर मनसे आणि ठाकरे गट यांच्यात युती होईल की नाही, यासंदर्भातील राजकीय उत्सुकता वाढीस लागली असताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मात्र युतीविषयी कोणतीही भूमिका मांडण्यास तयार नाहीत. मुंबईतील विजयी मेळावा केवळ मराठीपुरताच होता. त्याचा राजकारणाशी कुठलाही संबंध नाही. महानगरपालिका निवडणुकीस अद्याप काही महिने बाकी आहेत. त्यावेळचे चित्र पाहून युतीबाबत निर्णय घेतला जाईल, असे संकेत राज ठाकरे यांनी दिल्याचे समजते. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाशी हातमिळवणीचे ‘राज’ कायमच आहे.
इगतपुरीतील कॅमल व्हॅली रिसॉर्ट येथे आयोजित मनसे पदाधिकाऱ्यांच्या तीन दिवसीय शिबिरानिमित्त राज ठाकरे यांचे सोमवारी आगमन झाले. यावेळी काही प्रसारमाध्यमांशी त्यांनी अनौपचारिक संवाद साधला. मुंबईतील विजयी मेळाव्यात मनसेने युतीबाबत भूमिका न मांडल्याने ठाकरे गटाची अधिक अडचण झाली आहे. यासंदर्भात राज यांनी मराठीच्या मुद्यावर व्यासपीठावर एकत्र आल्याचे सांगितल्याचे समजते.
मराठी भाषा या विषयापुरताच मेळावा होता. मेळाव्यातील भाषणात अन्य कुठल्याही विषयावर आपण भाष्य केले नसल्याचा दावा राज यांनी यावेळी केल्याचे सांगितले जाते. मेळाव्याचा राजकारणाशी कुठलाही संबंध नसल्याचे सांगून मनसे आणि उद्धव ठाकरे गट युतीबाबत राज यांनी स्पष्टपणे बोलणे टाळल्याचा दावा केला जात आहे.
महापालिका निवडणुका नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होतील. त्यावेळचे चित्र पाहून मनसेकडून निर्णय घेतला जाईल, असे संकेतही त्यांनी दिल्याचे समजते. महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळेत सेमी इंग्लिश सुरु केल्यास सामान्य विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. ज्या पालकांना आपल्या पाल्याला इंग्रजी शाळेत शिकविण्याची ऐपत नाही, त्या पालकांना याचा लाभ होईल. नाशिकमध्ये पाच मंत्री असतांनाही अनेक नागरी प्रश्न प्रलंबित असून ते सोडविले गेले नसल्याचा आक्षेप नोंदविल्याचे सांगितले जाते.
नाशिक महानगर पालिकेत भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघड होत असतानाही यावर सत्ताधारी मौन बाळगून आहेत. नव्याने झालेले महामार्ग, स्मार्ट सिटी, उड्डाणपूल आदी रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. अपघातांचे प्रमाणही वाढले असून सत्ताधारी मात्र उपाययोजना न करता ठेकेदारांना पाठीशी घालून सामान्यांच्या जिवाशी खेळत असल्याचा त्यांचा सूर होता. मनसेच्या शिबिरात राज्यातील प्रमुख नेते, राज्यस्तरीय पदाधिकारी, उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस, शहराध्यक्ष असे १०० हून अधिक जण सहभागी झाले आहेत.