नाशिक : नाशिक विमानतळाचा हज यादीत समावेश करण्यासाठी राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुक्तार नक्वी यांच्याकडे विशेष शिफारस केली आहे. यासंदर्भात खा. हेमंत गोडसे यांनीही दिल्लीत मुक्तार नक्वी यांची भेट घेत उत्तर महाराष्ट्रातील हज यात्रेकरूंना न्याय देण्यासाठी नाशिक विमानतळाचा समावेश लवकरात लवकर हजच्या यादीत करावा, अशी मागणी केली.

मुस्लीम बांधवांसाठी हज यात्रा पवित्र मानली जाते. या यात्रेला जाण्याची प्रत्येकाची इच्छा असते. विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार या जिल्ह्य़ांतून दरवर्षी १२ ते १५ हजार मुस्लीम बांधव हज यात्रेसाठी जात असतात. यासाठीची प्रक्रिया राज्य शासनाने ऑनलाइन केली असली तरी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी हज भाविकांना मुंबई येथे तीन ते चार वेळा जावे लागते. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर भाविकांना मुंबई विमानतळावरून हज यात्रेसाठी रवाना व्हावे लागते. यात पैसा आणि वेळेचा अपव्यय होत असल्याने हज भाविकांची मोठी गैरसोय होते. याची दखल घेत हज यात्रेसाठी उत्तर महाराष्ट्राचे मुख्य केंद्र म्हणून नाशिक येथे व्यवस्था व्हावी, मुंबईऐवजी नाशिक येथून हज येथे जाणाऱ्या भाविकांना विमानसेवा उपलब्ध होण्यासाठी नाशिक विमानतळाचा हजच्या यादीत समावेश करण्याविषयी गोडसे यांनी काही महिन्यांपासून राज्य सरकारसह केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक आणि अल्पसंख्याक विभागाच्या सचिव जयश्री मुखर्जी यांनी या मागणीची दखल घेतली आहे. गेल्या वर्षी हज यात्रेसाठी राज्यभरातून सुमारे १५ हजार भाविक गेले होते. यापैकी तीन हजार भाविक एकटय़ा उत्तर महाराष्ट्रातून गेले होते. यावरून उत्तर महाराष्ट्रातून हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असल्याचे उघड होते. हज यात्रेला जाण्याकरिता भाविकांना मुंबईला ये-जा करावी लागत असल्याने यात्रेकरूंवर मोठय़ा प्रमाणावर अतिरिक्त आर्थिक भार पडतो. त्यामुळे नाशिक विमानतळाचा हजच्या यादीत समावेश करण्याची शिफारस राज्य सरकारने केंद्र सरकारला केली आहे.