समाधानकारक दराचा आंदोलनांवर परिणाम
अत्यल्प दरामुळे मध्यंतरी एक-दीड वर्षे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना यंदा लाल कांद्याने चांगलाच दिलासा दिला आहे. एरवी या काळात गडगडणाऱ्या भावामुळे सर्वत्र आंदोलने ठरलेली असतात. पाच वर्षांत कधी न मिळालेला दर सध्या या कांद्याला मिळत आहे. यामुळे उत्पादन घटूनही शेतकऱ्याच्या हाती दोन पैसे पडले. परिणामी, कांदा उत्पादक पट्टय़ातील आंदोलने थंडावली आहेत.
उन्हाळ कांदा संपुष्टात येण्याच्या मार्गावर असताना म्हणजे ऑगस्ट-सप्टेंबरपासून कांदा दरात वाढ झाली. तेव्हापासून आतापर्यंत कांद्याचे दर सरासरी दोन ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलची पातळी राखून आहेत. नवीन लाल कांद्याची मुबलक आवक झाल्यावर दर कोसळतात. हा कांदा नाशवंत असतो. तो साठवता येत नाही. मिळेल त्या भावात विक्री करण्याशिवाय गत्यंतर नसते. त्याचे भाव दोलायमान राहतात.
बाजारातील आजवरच्या स्थितीला या वर्षी छेद मिळाला. अवकाळी पावसाचा देशातील कांदा पिकाला फटका बसला होता. नाशिकही त्यास अपवाद नव्हते. तुलनेत या भागात नुकसान कमी झाले. याचा लाभ स्थानिक उत्पादकांना होत आहे. देशांतर्गत मागणी वाढल्याने दर स्थिर राहिले. काही महिन्यांपूर्वी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर, दरवाढ रोखण्यासाठी सरकारने शून्यावर असणारे किमान निर्यात मूल्य प्रति टन ८५० अमेरिकन डॉलरवर नेले. यामुळे निर्यात थंडावली. दर ‘जैसे थे’ राहिले. अलीकडेच किमान निर्यात मूल्य १५० अमेरिकन डॉलरने कमी करण्यात आले आहे.
आवक वाढत असल्याने दर स्थिर ठेवण्यासाठी किमान निर्यात मूल्य शून्यावर नेणे गरजेचे असल्याकडे लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी लक्ष वेधले. सद्य:स्थितीत भारतीय कांदा अन्य देशांच्या तुलनेत महाग पडतो. मार्चपासून उन्हाळ कांदा बाजारात येण्यास सुरुवात होईल. त्याचा विचार करता आतापासून निर्यातीवरील हे अप्रत्यक्ष निर्बंध हटविणे आवश्यक आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे पाठपुरावा करण्यासाठी साकडे घालण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
नकदी पीक म्हणून कांद्याची लागवड करणारे नाशिकसह राज्यात लाखो शेतकरी आहेत. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय फलोत्पादन आणि विकास प्रतिष्ठान (एनएचआरडीएफ) संस्थेने निश्चित केलेला ८५० रुपये प्रति क्विंटल उत्पादन खर्च अनेकदा कांदा विक्रीतून त्यांना मिळालेला नाही. वारंवार हात पोळले जाऊनही अन्य पर्याय नसल्याने कांदाच पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना या हंगामात खऱ्या अर्थाने समाधान लाभल्याचे चित्र आहे.
कसर भरून निघाली..
कांद्याचे दर कधी कधी पाच ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलवर देखील गेले आहेत, परंतु सलग काही महिने एकाच पातळीवर ते टिकून राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. असे याआधी कधी घडले होते ते वडीलधाऱ्या मंडळींनादेखील सांगता येत नाही. उन्हाळ, रांगडा, लाल अशा तिन्ही कांद्यांचे आम्ही १५ एकरमध्ये उत्पादन घेतले. त्या मालास सरासरी २५०० ते २७०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणामुळे ज्या गुणवत्तेच्या मालाचे उत्पादन अपेक्षित होते, तसे झाले नाही. तरीदेखील सर्व मालास चांगला दर मिळाला. मध्यंतरी १५ ते २० महिन्यांत गडगडलेल्या दराची कसर या हंगामात भरून निघाली आहे.
– प्रसाद पगार (शेतकरी, नांदगाव)
प्रथमच नफा
दोन-तीन वर्षांपासून दर नव्हते. उत्पादन खर्चही भरून निघत नव्हता. अवकाळी पावसामुळे यंदा सरासरी उत्पादन कमी झाले. मुदतीआधीच कांदा निघाला. परंतु, उंचावलेल्या दरामुळे शेतकऱ्यांना प्रथमच नफा मिळाला. या हंगामात बाजार सलग काही महिने टिकून राहणे ही महत्त्वाची बाब आहे. सध्या बाजारात चांगली स्थिती असली तरी उन्हाळ कांद्याच्या हंगामात काय होईल हे सांगता येत नाही. पाऊसमान चांगले असल्याने उन्हाळ कांद्याची लागवड वाढली आहे.
– राजेंद्र होळकर (शेतकरी, लासलगाव)
पाच वर्षांच्या तुलनेत दुप्पट, तिप्पट दर
लासलगाव बाजार समितीत काही दिवसांपूर्वी ३५०० रुपये प्रति क्विंटलवर पोहचलेला कांदा सध्या प्रति क्विंटलला २८०० रुपयांपर्यंत खाली आला आहे. कांदा दरात चढ-उतार होत असला तरी मागील पाच वर्षांतील बाजारभावाची आकडेवारी पाहिल्यास यंदा शेतकऱ्यांना दुप्पट वा तिपटीने अधिक दर मिळाल्याचे लक्षात येते. चालू हंगामात आतापर्यंत लासलगाव बाजारात नऊ लाख क्िंवटल लाल कांद्याची विक्री झाली आहे. गतवर्षी संपूर्ण हंगामात सुमारे २५ लाख क्विंटल कांद्याची आवक झाली होती. या हंगामात कांद्याला सरासरी २८०० रुपये सरासरी दर मिळाला. जानेवारी २०१७ मध्ये हाच भाव केवळ ५९८ रुपये होता. २०१६ मध्ये १०७८ रुपये, २०१५ मध्ये १२६३ रुपये, २०१४ मध्ये ९७७ तर, २०१३ मध्ये लाल कांद्यास १४४१ रुपये दर मिळाल्याची माहिती बाजार समितीकडून देण्यात आली.