स्थानिक पातळीवर नमुने तपासणीची प्रतीक्षा
नाशिक : जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या मुख्यत्वे मालेगाव शहरात वाढत असतांना संशयित रुग्णांचे अहवाल येण्यास लागणारा विलंब आरोग्य आणि जिल्हा प्रशासनाची काळजी वाढविणारा ठरत आहे. सद्यस्थितीत २६२ संशयित रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत. अहवाल प्राप्त होण्यास होणारा विलंब कमी करण्यासाठी स्थानिक पातळीवर मविप्र शिक्षण संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात करोना चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्यास मान्यता मिळाली. या संबंधीची पडताळणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ती पार पडल्यानंतर संशयित रुग्णांचे अहवाल लवकर मिळू शकतील.
जिल्ह्यात आतापर्यंत करोनाचे १४२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील १२ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर दोन रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. याशिवाय मालेगावच्या रुग्णालयात उपचार घेणारा चांदवड येथील रुग्णही करोनामुक्त झाला असून त्याची १४ दिवसानंतर २४ तासाच्या अंतराने केलेली चाचणी नकारात्मक आल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. मालेगाव येथील अन्य १० रुग्णांचे पहिले अहवाल नकारात्मक आलेले आहेत. दुसरे अहवाल नकारात्मक आल्यास त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्याबाबत निर्णय घेतला जाईल. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११३२ संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यातील ७२८ रुग्णांचे अहवाल नकारात्मक आले तर १४२ रुग्णांचा अहवाल सकारात्मक आला. सद्यस्थितीत २६२ संशयितांचे अहवाल प्राप्त झालेले नाहीत. ताप, सर्दी, खोकला ही लक्षणे असणाऱ्या रुग्णांना दाखल करून त्यांचे नमुने पाठविले जातात. यामुळे संशयित रुग्णांची संख्या दिवसागणिक बदलते. सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात करोनाचे १५, नाशिक महापालिकेच्या डॉ. जाकीर हुसेन रुग्णालयात दोन, तर मालेगाव महापालिकेच्या रुग्णालयात १११ रुग्ण उपचार घेत आहेत. रमजानच्या कालावधीत प्रत्येकाने घरुनच प्रार्थना करुन सामाजिक अंतराचे पालन करून आपले आणि आपल्या कुटुंबाचे करोनापासून रक्षण करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी मांढरे यांनी केले आहे.
प्रयोगशाळेची अंतिम पडताळणी प्रगतीपथावर
करोना चाचणी जलद होण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयोगशाळेला मान्यता मिळूनही नमुने तपासणीचे काम सुरू होऊ शकलेले नाही. याविषयी अंतिम टप्प्यात पडताळणी सुरू असून त्यास आणखी काही वेळ लागणार आहे. परिणामी, स्थानिक पातळीवर नमुने तपासणीसाठी अद्याप प्रतीक्षा करावी लागत आहे. जिल्ह्यातील संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी धुळे अथवा पुण्याला पाठविले जातात. तेथून अहवाल येण्यास तीन ते चार दिवसांचा कालावधी लागतो. याामध्ये होणारा कालापव्यय टाळण्यासाठी प्रशासनाच्या पाठपुराव्यामुळे मविप्र शिक्षण संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात प्रयोगशाळा स्थापण्यास भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने मान्यता दिली आहे. तपासणीसाठी तीन हजार चाचणी संच उपलब्ध करण्याची तयारी करण्यात आली. चार तासात ९० नमुने तपासणीची या यंत्रणेची क्षमता आहे. तीन-चार दिवसात तपासणीचे काम प्रत्यक्षात सुरू होईल ही अपेक्षा पूर्णत्वास जाऊ शकली नाही. सध्या प्रयोगशाळेशी निगडीत अंतिम टप्प्यातील पडताळणीचे काम सुरू आहे. त्यास काही अवधी लागणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
घोटी पुन्हा आठ दिवस पूर्णपणे बंद
इगतपुरी तालुक्याचे प्रमुख बाजारपेठ असलेले घोटी शहर पुन्हा आठ दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपालिकेने घेतला आहे. ग्रामपालिकेने दवंडीद्वारे वैद्यकीय बाबी वगळता इतर अत्यावश्यक सेवाही बंद राहणार असल्याचे जाहीर केले आहे. करोनाचा शहरात प्रादुर्भाव होऊ नये म्हणू हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार रविवारपासून तीन मेपर्यंत शहर बंद राहणार आहे. गावाबाहेर जाणारे कर्मचारी आणि व्यापाऱ्यांनीही शहराबाहेर जाऊ नये, असे सूचित करण्यात आले आहे.