मध्य रेल्वेच्या मुंबई क्षेत्रीय समितीच्या बैठकीत प्रशासनाचा दावा

मनमाड : नाशिक जिल्ह्य़ातील प्रवाशांसाठी फायदेशीर असलेली आणि मनमाडहून सुटणारी राज्यराणी एक्स्प्रेस मनमाडऐवजी नांदेडहून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी या एक्स्प्रेसमधील मनमाड आणि नाशिकसाठी आरक्षित असलेल्या प्रत्येकी दोन डब्यांचे दरवाजे त्या त्या स्थानकांवरच उघडण्यात येतील, असा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई क्षेत्रीय समितीची बैठक मुंबई रेल्वे क्षेत्राचे मुख्य महाप्रबंधक संजय मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत दिंडोरीच्या खासदार भारती पवार यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेले भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रीय सदस्य नितीन पांडे यांनी राज्यराणी एक्स्प्रेस मनमाडऐवजी नांदेडहून सोडण्याच्या निर्णयाविषयी नाराजी व्यक्त केली असता प्रशासनाने आपली भूमिका मांडली. या गाडीस ४३ टक्क्यांपेक्षाही कमी उत्पन्न  मिळत आहे. त्यामुळे ती नांदेडहून सोडण्यात येणार आहे. परंतु राज्यराणी एक्स्प्रेसमध्ये मनमाडसाठी दोन आणि नाशिकसाठी दोन आरक्षित डबे बंद स्वरूपात येणार असून ते डबे मनमाड, नाशिक येथेच उघडण्यात येतील, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

मनमाड हे मध्य रेल्वेचे भुसावळ मंडळातील मुख्य स्थानक असून उत्तर महाराष्ट्राचे प्रवेशद्वार आहे. मनमाड मार्गेच दक्षिण आणि उत्तर भारतातील बहुसंख्य प्रवासी शिर्डीकडे रवाना होतात. शिर्डीसाठी थेट गाडय़ांची संख्यादेखील कमी आहे. त्यामुळे येणाऱ्या भाविक प्रवाशांना मनमाडला थांबा घेऊन पुढील प्रवास करावा लागतो. त्यामुळे मनमाड-शिर्डी अशी शटल सेवा सुरू करावी, अशी मागणीही पांडे यांनी केली. तसेच शहरालगत १९५२ मध्ये बांधण्यात आलेल्या महादेव नाला बंधाऱ्यातील पूर्ण गाळ काढून या जुन्या रेल्वे बंधाऱ्याची नव्याने पुनर्बाधणी करावी, असेही पांडे यांनी बैठकीत सुचविले. या बंधाऱ्याची पुनर्बाधणी झाल्यास रेल्वे प्रशासनाला स्थानक स्वच्छता आणि इतर बाबींसाठी लागणारी पाण्याची व्यवस्था तसेच समस्या पूर्णपणे सुटणार आहे.

मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचे काम कधी सुरू होणार, असा प्रश्नही पांडे यांनी उपस्थित केला. त्यावर रेल्वे प्रशासनाने ८८५७.९८ कोटी रुपयांचे विस्तृत अंदाजपत्रक रेल्वे मंडळाकडे पाठविण्यात आले असल्याची माहिती दिली. मनमाड रेल्वे स्थानकात सध्या असणाऱ्या सहा फलाटांची संख्या आगामी काळात वाढणाऱ्या गाडय़ांची संख्या बघता कमी पडणार आहे. त्यामुळे फलाटांच्या संख्येत देखील वाढ करावी, स्थानकातील पिण्याच्या पाण्याच्या नळांची संख्या वाढवावी, अशी मागणीही पांडे यांनी केली. सर्व मागण्यांना रेल्वे प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला. बैठकीस महाराष्ट्र, मध्य प्रदेश या राज्यातील सुमारे ६७ क्षेत्रीय समिती सदस्य आणि मुंबई क्षेत्रातील सर्वच रेल्वे विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.