लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव: अमळनेर येथील दंगल प्रकरणात अटकेत असलेला संशयित माजी नगरसेवकपुत्र अशफाक सलीम शेख (३३, रा. दर्गाअली मोहल्ला, गांधीपुरा, अमळनेर) याचा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात बुधवारी सायंकाळी मृत्यू झाला. अशफाकचा मृत्यू झाल्याची वार्ता अमळनेरमध्ये पोहोचताच तणावपूर्ण वातावरण झाले. शहरात पोलीस प्रशासनाकडून सतर्कता पाळत कुणीही अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले. गुरुवारी दुपारी चारपर्यंत शहर बंद ठेवण्यात आले आहे.

अमळनेरमध्ये दोन लहान मुलांच्या भांडणाचे पर्यावसन दोन गटांतील तुफान दगडफेकीत झाले होते. दंगलीत सहायक निरीक्षकांवर तलवारीचे वार करण्यात आले होते. काही हातगाड्या उलथवून लावण्यात आल्या होत्या. पोलीस कर्मचार्‍यांसह अनेक नागरिकही जखमी झाले होते. दंगलीदरम्यान पोलिसांनी सुरुवातीला २९ आणि नंतर दोन, अशा ३१ संशयितांना अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती. यात अमळनेरचे माजी नगरसेवक सलीम टोपी यांचा मुलगा अशफाक याचाही समावेश होता.

आणखी वाचा-बस… एवढेच बाकी होते… शिक्षकाकडून लाच स्वीकारताना मुख्याध्यापकासह तिघे जाळ्यात

कोठडीत असतानाच त्याची प्रकृती खालावल्याने मंगळवारी पहाटे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर अमळनेरमधील दुकाने पटापट बंद झाली. नागरिकांचीही पळापळ सुरू झाली. दगडफेक झाल्याची अफवा पसरली होती. शहरातील संवेदनशील भागासह अन्य भागांतही अधिकची पोलीस कुमक तैनात करण्यात आली आहे. शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडला नसल्याचे पोलीस वाहनातील ध्वनिक्षेपकांवरून सांगण्यात आले. अमळनेरचे आमदार अनिल पाटील, माजी नगरसेवक करीम सालार, अजीज सालार, जिल्हा मणियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, एमआयएमचे रियाध जहागीरदार आदींनी शांततेचे आवाहन केले आहे.