|| चारुशीला कुलकर्णी

मोडीचे दरही वाढले, चीन आणि अफगाणीस्तानमधून धातुंची निर्यात थांबली

नाशिक : भांडी बाजारात वेगवेगळ्या धातुंच्या भांड्याच्या किंमती वाढल्या असून मोडीच्या दरातही वाढ झाली आहे. करोनाचा संसर्ग वाढल्याने चीनकडून निर्यात होणाºया वेगवेगळ्या उत्पादनांवर बंदी आणण्यात आली. त्यातच अफगाणिस्तानातील राजकीय घडामोडींचा परिणाम वेगवेगळ्या क्षेत्रांवर जाणवू लागला आहे. भांड्यांसाठी लागणारे तांबे, पितळ, स्टील, अ‍ॅल्युमिनीयमसह अन्य धातुंच्या आयातीवर याचा परिणाम होत असल्याने भांड्यासह अन्य उत्पादनांचे दर वाढले आहेत.

सध्या चीन आणि अफगाणिस्तानमधून धातुंची निर्यात थांबली असल्याचा परिणाम भांड्यांच्या दरावर झाला आहे.   सध्या चातुर्मास सुरू असून यामध्ये दानाला महत्व आहे. नवरात्रोत्सवानिमित्त कुमारी पूजनासह अन्य कार्यक्रमात तांबे, पितळ्याची ही भांडी वापरली जातात. तर काही वेळा ही भांडी दान म्हणूनही दिली जातात. आता मंदिरेही उघडली आहेत. देवळात देण्यासाठी घंटा, तांब्याचा कळस असा नवस काही जणांकडून केला जातो. त्यासाठीही ही भांडी लागतात, असे हरिओम गृहोपयोगी वस्तू भांडारचे अरूण पाटील यांनी सांगितले.

सध्या या सर्वांचे दर वाढले  असून बाहेरून येणारी धातुंची  आयात थंडावली आहे.

दुसरीकडे, सरकार तांबे, पितळवर वस्तू सेवाकर लावण्याच्या विचारात आहे. याचाही परिणाम भांडी बाजारातील भांड्यांच्या किंमतींवर झाला आहे. सध्या रोज दर बदलत असल्याचेही पाटील म्हणाले.

मोडीचा दरही वाढला आहे. या मध्ये तांब्यासाठी ५५० रुपये प्रति किलो, अ‍ॅल्युमिनियमसाठी १२५ ते १५० रुपये तर स्टेनलेस स्टीलसाठी ४० ते ४५ रुपये प्रति किलो अशी मोड येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, वाढलेल्या दरांमुळे महिला वर्गाची पंचाईत झाली आहे. वेगवेगळ्या आकारातील भांडी खरेदीची आवड असणाºया महिलांना आपल्या हौशीला मुरड घालावी लागत आहे. जुनी भांडी मोडीत देऊन नवी भांडी खरेदीचा घाट घातला. पण मोडीचे दर वाढले असले तरी नव्या भांड्याचा दर परवडण्यासारखा नाही. परिणामी ही खरेदी पुढे ढकलण्याचा विचार सुरू असल्याचे सुनंदा चौधरी यांनी सांगितले.