जळगाव – जिल्ह्यात मुख्यमंत्री व प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून अनेक ठिकाणी ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र, रस्त्यांची कंत्राटे घेणाऱ्यांवर कोणाचेही नियंत्रण न राहिल्याने त्यापैकी काही रस्त्यांची लोकार्पण होण्याआधीच वाताहत झाल्याचे दिसून आले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातही सुमारे तीन कोटी रूपयांच्या निधीतून तयार केलेला एक रस्ता तीन महिनेही टिकलेला नाही.
जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा पहिला व दुसरा टप्पा यशस्वी झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्याला देखील गेल्या वर्षी मान्यता मिळाली होती. त्या माध्यमातून विशेषतः जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातील ६३ किलोमीटर अंतराच्या १५ रस्त्यांसाठी सुमारे ८० कोटी ४२ लाख तसेच देखभाल आणि दुरुस्तीसाठी पाच कोटी, असा एकूण सुमारे ८५ कोटी रूपयांचा मोठा निधी मंजूर झाला होता. जळगाव तालुक्यातील कुसुंबा ते धानवड तांडा, रामदेववाडी ते कुऱ्हाडदे, जवखेडा ते सुभाषवाडी रस्ता, डोमगाव ते बोरणार, कानळदा ते विदगाव, आसोदा ते नांद्रा खुर्द तालुका हद्द, सुजदे ते भोलाणे तालुका हद्द तसेच धरणगाव तालुक्यातील काही रस्त्यांचा त्यात समावेश होता. याशिवाय, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतूनही काही रस्त्यांची कामे केली जात आहेत. ज्यामध्ये ममुराबाद ते नांद्रा खुर्द रस्त्याचा समावेश होता.
मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाल्यावर वर्षानुवर्षे खड्ड्यांमधून मार्गक्रमण करणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले होते. खुद्द पालकमंत्री पाटील यांनी त्यावेळी ग्रामीण भागातील रस्ते आता खऱ्या अर्थाने दर्जेदार होतील. संबंधित कंत्राटदारांवर पुढील पाच वर्षांसाठी देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी निश्चित करण्यात आल्याने ग्रामसडक योजना ग्रामीण भागासाठी वरदान ठरेल, असे दावा केला होता. प्रत्यक्षात, मर्जीतील कंत्राटदारांनाच रस्त्यांची कामे देण्यासाठी शासकीय यंत्रणेवर दबाव आणला गेल्याने ग्रामसडक योजनेतून झालेल्या काही रस्त्यांची लोकार्पण होण्याआधीच दुरावस्था झाली आहे.
ममुराबाद ते नांद्रा खुर्द या पाच किलोमीटरच्या रस्त्यासाठीही प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून सुमारे तीन कोटी ४२ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला होता. ३१ मार्च २०२५ रोजी पूर्ण झालेला हा रस्ता तीन महिन्यातच खचला असून, कामाचा एकूण निकृष्ठ दर्जा लक्षात घेता त्याकडे संबंधित विभागाने सोयीस्कर डोळेझाक केल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सदरच्या रस्त्यावर आणखी एक थर बाकी असल्याचे म्हटले आहे. मात्र, खालचा भराव व्यवस्थित झालेला नसताना नंतर कितीही थर टाकले तरी तो रस्ता जास्त दिवस टिकणार नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
ममुराबाद-नांद्रा खुर्द रस्त्याचे काम सुरू असतानाच पाऊस पडल्याने डांबरीकरण व्यवस्थित होऊ शकले नाही. आणखी एक थर टाकल्यावर खचलेला रस्ता चांगला होईल. कंत्राटदाराकडे पाच वर्षे देखभाल-दुरूस्तीची जबाबदारी असून, पुढील १० वर्षे एकही खड्डा रस्त्यावर दिसणार नाही. – गुलाबराव पाटील (पालकमंत्री, जळगाव)