जनलक्ष्मी सहकारी बँकेवर समृध्दी पॅनलने एकहाती विजय मिळवत विरोधकांना धुळ चारली. श्री समर्थ सहकारी बँकेवर सत्ताधारी समर्थ पॅनलने पूर्णपणे वर्चस्व राखले. मविप्र शिक्षण संस्थेच्या सेवक सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या समर्थ पॅनलने विजय मिळविला.जनलक्ष्मी बँकेत सर्वसाधारण व इतर मागास प्रवर्गातील सर्व जागांवर समृध्दी पॅनलचे उमेदवार विजयी झाले. तर बिनविरोध निवडून आलेल्या दोन्ही जागाही याच पॅनलच्या आहेत. निवडणुकीत केवळ ११.५० टक्के मतदान झाले होते. सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी गौतम बलसाणे यांच्या उपस्थितीत लक्षिका मंगल कार्यालयात मतमोजणी झाली. निवडणुकीत मतदान अतिशय कमी झालेले असल्याने निकालाची सर्वांना उत्सुकता होती. मतमोजणीत सत्ताधारी समृध्दीचे उमेदवार आणि विरोधी उमेदवारांच्या मतांमध्ये मोठा फरक असल्याचे स्पष्ट झाले. सर्वसाधारण गटातून समृध्दी पॅनलचे रवींद्र अमृतकर, आनंद करवा, समीर कांबळे, सागर कांबळे, जयंत जानी, भालचंद्र पाटील, महेंद्र बच्छाव, श्रीकांत रहाळकर, जितेंद्र सामंत, सतीश सोनवणे हे विजयी झाले. महिला राखीव गटात शालिनी डुंबेरे, स्वप्ना निंबाळकर यांनी विजय प्राप्त केला. इतर मार्गास प्रवर्गात संजय पाटील यांनी २९०९ मते घेऊन दणदणीत विजय मिळवला. अनुसूचित जाती, जमाती गटातून शरद गांगुर्डे, विमुक्त जाती, जमाती विशेष जमाती प्रवर्गातून उत्तमराव उगले यांची आधीच बिनविरोध निवड झालेली आहे. बँकेचे संस्थापक माजी खासदार माधवराव पाटील यांच्या पश्चात झालेली ही पहिलीच निवडणूक होती. त्यांच्या काही सहकाऱ्यांनी बंडाचे निशाण फडकावत समृध्दी पॅनलला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो पूर्णत: फसला. विरोधी गटाच्या रत्नाकर गायकवाड, संजय चव्हाण, संदीप नाटकर, विजय राऊत यांना मोठ्या फरकाने पराभवाचे धनी व्हावे लागले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>“आम्ही ब्राह्मण आहोत आणि याचा आम्हाला गर्व आहे, पण…”, मोदींचा उल्लेख करत अमृता फडणवीसांचं वक्तव्य

श्री समर्थ बँकेवर समर्थ पॅनलचे वर्चस्व
श्री समर्थ सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत समर्थ पॅनलने आपले पूर्णत: वर्चस्व राखले. निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश पाटील यांनी मतमोजणीनंतर अंतिम निकाल जाहीर केला. यात सर्वसाधारण गटात मंदार ओलतीकर, नरेंद्र कुलकर्णी, श्रीपाद कुलकर्णी, राजेंद्र खेडलेकर, मनोज गोडसे, मंदार तगारे, राधाकृष्ण नाईकवाडे, पुष्कर पाराशरे, मनोज बाग आणि शिरीष मोराळकर यांनी विजय मिळवला. या गटात सुहास भणगे पराभूत झाले. अन्य गटातून राजेश गांगुर्डे, योगिता खांडेकर, किशोरी एकबोटे, रविकिरण निकम व जालिंदर ताडगे हे बिनविरोध निवडून आले.

हेही वाचा >>>दूध संघाच्या कार्यकारी संचालकांसह चौघांना अटक, तूप अपहार प्रकरणी कारवाई

मविप्र सेवक सोसायटीवर समर्थची हॅट्रीक
मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या सेवक सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या समर्थ पॅनलने १६ जागांवर विजय संपादीत करीत सलग तिसऱ्यांदा वर्चस्व राखले. विरोधी सेवक पॅनलला केवळ एका जागेवर यश मिळाले. मविप्रत कायमस्वरुपी सेवेत असणाऱ्या शिक्षकांची ही सोसायटी आहे. काही महिन्यांपूर्वी संस्थेत सत्तांतर झाल्यामुळे सेवक सोसायटीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष होते. पहिल्या फेरीपासून समर्थ पॅनलच्या उमेदवारांनी आघाडी घेतली. ओबीसी गटात बळीराम जाधव, तर महिला राखीव गटात वैशाली कोकाटे व सुवर्णा कोकाटे, भटक्या विमुक्त जाती-जमाती प्रवर्गात संजय नागरे, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गात किरण उघडे हे विजयी झाले. राखीव प्रवर्गातील निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वसाधारण गटातील १२ जागांसाठी अटीतटीची लढत झाली. विरोधी पॅनलचे संजय शिंदे वगळता सर्व जण पराभूत झाले. उर्वरित सर्व जागांवर समर्थ पॅनलने विजय मिळवला. नानासाहेब दाते, गुलाब भामरे व सुप्रिया सोनवणे यांनी पॅनलचे नेतृत्व केले. विजयी उमेदवारांमध्ये नंदकुमार घोटेकर, सुनील आहेर, विनीत पवार, सुनिल काळे, मंगेश ठाकरे, ज्ञानेश्वर जाधव, मनिष बोरसे, कृष्णराव मोरे, अनिल भंडारे, शांताराम चांदोरे, दत्तराज ह्याळीज यांचा समावेश आहे. विरोधी सेवक पॅनलचे डॉ. संजय शिंदे हे एकमेव उमेदवार विजयी झाले.

(जनलक्ष्मी सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजयी झालेले समृध्दी पॅनलचे उमेदवार)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ruling samarth panel wins in janalakshmi samarth bank and mvipr sevak society amy
First published on: 15-11-2022 at 15:56 IST