सोलापूर : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते प्रा. लक्ष्मण हाके यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात बंडखोरी करून माढा लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वेशभूषेत जिल्हाधिकारी कार्यालयात अवतरले. तेव्हा त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले.
प्रा. लक्ष्मण हाके यांनी दोन वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनी राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे. सध्या शिवसेनेचे प्रवक्ते असताना त्यांनी माढा लोकसभेची जागा लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. उद्धव ठाकरे यांनी संधी दिल्यास माढ्यात उभे राहण्याची भूमिका त्यांनी जाहीर केली होती. परंतु माढा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे आहे. राष्ट्रवादीकडून धैर्यशील मोहिते-पाटील यांचे भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना कडवे आव्हान उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर चर्चेत असलेल्या माढा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या विरोधात बंड करीत, प्रा. लक्ष्मण हाके यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.
हेही वाचा – सांगलीत कॉंग्रेस, उबाठा शिवसेनेत मनोमिलन ?
हेही वाचा – शरद पवारांचं वक्तव्य, “रामाच्या मंदिरात सीतेची मूर्ती का नाही?, महिलांची नाराजी…”
महात्मा फुले यांची वेशभूषा करून उमेदवारी दाखल करण्याचा मागचा हेतू विशद करताना प्रा. हाके यांनी, महात्मा फुले हे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी ज्या वेशभूषेत हंटर कमिशनसमोर गेले होते, त्याच महात्मा फुलेंच्या विचारांचा कार्यकर्ता म्हणून देशाच्या संसदेत महात्मा फुले यांचा विचार घेऊन जाण्याची माझी भूमिका आहे. माढा मतदारसंघात ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती-जमातींचे अकरा लाख मतदार आहेत. त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आपण लोकसभा निवडणुकीत उतरल्याचे स्पष्ट केले.