जळगाव : जिल्ह्यातील जामनेरमध्ये नगराध्यक्षपदासाठी भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांच्या सौभाग्यवती साधना महाजन यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, मंत्री महाजनांचे स्वीय सहाय्यक दीपक तायडे यांच्या सौभाग्यवतीने प्रभाग ११ ब मधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या निवडीचा मार्ग मंगळवारी मोकळा झाला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रिया सुरू होताच महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये अधिकाधिक जागांवर वर्चस्व मिळवण्याची चढाओढ तीव्र झाली आहे. लोकसभा–विधानसभा निवडणुकांप्रमाणेच स्थानिक स्तरावरही भाजप आपली पकड मजबूत ठेवण्यासाठी सज्ज झाली असून, यासाठी प्रमुख नेते सक्रिय झाले आहेत. मंत्री गिरीश महाजन, संजय सावकारे आणि आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना नगराध्यक्षपदाची संधी मिळावी यासाठी अलीकडच्या दिवसांत सुरू केलेल्या हालचालींची चर्चा मोठ्या प्रमाणावर रंगली होती. मात्र, आतापर्यंत तिघांनीही याबाबत कोणताही स्पष्ट खुलासा केला नव्हता. आता अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया प्रत्यक्षात पूर्ण होताच सर्व नेते हळूहळू आपली भूमिका स्पष्ट करत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पुष्टी मिळाल्याचे  दिसून लागले आहे.

जामनेर नगर परिषदेसाठी यंदाच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी जाहीर झाले होते. दरम्यान, नगराध्यक्षपदासाठी कोणाला उमेदवारी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना मंत्री गिरीश महाजन त्यांच्या सौभाग्यवती साधना महाजन यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. साधना महाजन यांना यापूर्वीही जामनेरच्या नगराध्यक्षा म्हणून काम करण्याचा अनुभव असल्याने त्यांच्या नावाला भाजप पक्ष श्रेष्ठींकडूनही पंसती दिला जात होती. अखेर सोमवारी भाजपने त्यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आणि त्यानंतर साधना महाजन यांनी नगराध्यक्षपदासाठी आपला अर्ज दाखल केला. यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अटकळांना पूर्णविराम मिळाला. आणि जामनेरच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला.

दुसरीकडे, जामनेर नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ११ ब मध्ये भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार उज्ज्वला तायडे यांनी नगरसेवकाच्या पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. ज्या मंत्री गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक दीपक तायडे यांच्या सौभाग्यवती आहेत. उज्ज्वला तायडे यांच्या विरोधातील उमेदवाराचा अर्ज मंगळवारी नेमका छाननीच्या प्रक्रियेत बाद झाला. त्यामुळे उज्वला तायडे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. त्यांच्या या निवडीमुळे जामनेर शहरात भाजपचे कमळ फुलण्यास सुरुवात झाल्याची प्रतिक्रिया मंत्री महाजन यांनी दिली. यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार साधना महाजन, भाजपचे जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.