मालेगाव : गेल्या काही महिन्यांपासून येथील सामान्य रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची हेळसांड होत आहे. या प्रश्नी वारंवार पाठपुरावा करूनदेखील परिस्थितीत फरक पडत नाही. यामुळे औषध खरेदी करण्यासाठी सरकारकडे पैसा उपलब्ध नाही का, असा सवाल उपस्थित करत समाजवादी पार्टीतर्फे बुधवारी येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ अनोखे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रातील भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या तीन पक्षांच्या सरकार विरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘ ट्रिपल इंजिन सरकार के नाम पे चंदा दे बाबा…ए मावशी,ए काका, चंदा दे बाबा’ असे म्हणत आंदोलकांनी लोकांपुढे झोळी पसरवत पैशांची मागणी केली.

मालेगावातील सामान्य रुग्णालयात गेल्या सहा महिन्यांपासून औषध तुटवड्याची समस्या उद्भवलेली आहे. सद्य:स्थितीत जवळपास २०० प्रकारच्या औषधांचा तुटवडा आहे. मालेगाव शहरात मधुमेह व रक्तदाब आजाराच्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. या आजारावरील औषधे देखील सामान्य रुग्णालयात उपलब्ध नाहीत. अगदी सर्दी,ताप,थंडी व खोकल्याची आणि लहान मुलांच्या उपचारांसाठी आवश्यक असणाऱ्या औषधांची देखील कमतरता निर्माण झाली आहे. तसेच या ठिकाणी सलाइनची देखील अनुपलब्धता आहे. त्यामुळे उपचारासाठी आवश्यक औषधे उपलब्ध होत नसल्यामुळे अनेकदा रुग्णांवर बाहेरून औषधे आणण्याची पाळी येत आहे. तसेच त्याचा रुग्णांच्या उपचारावर विपरीत परिणाम होत असल्याची ओरड केली जात आहे.

मालेगाव हे झोपडपट्टयांचे शहर आहे. येथील बहुसंख्य जनता ही दारिद्र्यरेषेखालील आहे. खाजगी उपचार परवडत नसल्याने सरकारी रुग्णालयातील उपचारांवरच येथील जनतेचे अवलंबित्व आहे. मात्र या रुग्णालयातील औषधांच्या तुटवड्यामुळे बाहेरून औषधे आणावी लागत असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची परवड होत आहे. यासंदर्भात रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश पाटील यांच्याकडे विचारणा केल्यावर औषधांच्या अनुपलब्धतेबद्दल वरिष्ठांना कळविण्यात आले आहे आणि लवकरच हा औषध साठा उपलब्ध होईल,असे प्रत्येक वेळी त्यांच्याकडून सांगण्यात येते. सलग सहा-सात महिन्यांपासून या परिस्थितीत बदल होत नसल्याने लोकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

यासंदर्भात संतप्त रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी मध्यंतरी सामान्य रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन केले. मात्र त्याची देखील दखल घेतली गेली नसल्याने समाजवादी पार्टीतर्फे बुधवारी येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ भीक मागो आंदोलन करण्यात आले. या ठिकाणी येणारे-जाणारे नागरिक तसेच वाहनधारकांना थांबवून त्यांच्याकडे आंदोलकांनी झोळी पसरवत भिक मागितली. पक्षाच्या युवा शाखेचे प्रदेश सरचिटणीस मुस्तकीम डिग्निटी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे राज्य सरकारमधील एक वजनदार मंत्री आहेत. त्यांच्या गावातील सामान्य रुग्णालयातील औषध साठ्याची इतकी दयनीय अवस्था असताना त्यांना ती दिसत नाही का, असा प्रश्न डिग्निटी यांनी यावेळी उपस्थित केला. भारतातील सर्वात श्रीमंत राज्य म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्र सरकारची औषध घेण्याची ऐपत नाही का, अशी शंका यामुळे उपस्थित झाल्याने लोकांकडून भिक मागून मिळालेले पैसे आरोग्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे डिग्निटी यांनी स्पष्ट केले. आमदार व खासदारांना सरकारकडून घसघशीत मानधन दिले जाते. त्यांनी देखील किमान सहा महिन्याचे मिळणारे मानधन सरकारी रुग्णालयातील औषध खरेदीसाठी सरकारला द्यावेत, असा सल्ला देखील डिग्निटी यांनी दिला आहे.