scorecardresearch

पालखेड डाव्या कालव्याच्या नूतनीकरणासाठी १८५ कोटी मंजूर

जागतिक बँकेच्या सिंम्प कार्यक्रमांतर्गत राज्यातील दोन प्रकल्पांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये जिल्ह्यातील पालखेड डावा कालव्यांचा समावेश आहे.

नाशिक: जागतिक बँकेच्या सिंम्प कार्यक्रमांतर्गत राज्यातील दोन प्रकल्पांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये जिल्ह्यातील पालखेड डावा कालव्यांचा समावेश आहे. शून्य ते ८५ किलोमीटर लाभ क्षेत्रातील पालखेड डावा कालव्याचे अस्तरीकरण आणि विस्तारीकरण तसेच दुरुस्तीचे काम करण्यासाठी १८५ कोटींच्या निधीस मंजुरी मिळाली आहे.

 या कामास प्रशासकीय मान्यता दिली गेली असून निविदा प्रक्रिया झाल्यावर लवकरच ही कामे सुरू केली जातील, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. मंगळवारी भुजबळ फार्म येथे जलसंपदा विभागाकडील विविध प्रलंबित विषयाबाबत आढावा बैठक झाली. यावेळी पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धने, जलसंपदा विभागाचे उपअभियंता चंद्रकांत टोपले, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर उपस्थित होते.

सिंम्प योजनेंतर्गत एशियन डेव्हलपमेंट बँकेमार्फत निधी दिला जाणार आहे. पालखेड डावा कालवा आणि त्याच्या लाभक्षेत्रातील सर्व वितरण व्यवस्था, भूजलात वाढ करण्यासाठीची कामे करण्यात येणार आहेत. या कामांसाठी  १८५ कोटी रुपयांची तरतूद केली गेली असून या प्रस्तावास राज्याच्या वित्त विभागाने सहमती दिलेली आहे. बँक सल्लागाराकडून प्रत्यक्ष पाहणीनंतर अहवाल आल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून काम करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. पालखेड डावा कालव्याचे अस्तरीकरण, विस्तारीकरण, दरवाजा बसवणे, पूल बांधणी, चारी दुरुस्ती ही कामे केली जाणार आहेत.

आवर्तन सोडताना नियोजन करा

शेती आणि पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करून आवर्तन सोडावे, असे भुजबळ यांनी सूचित केले. नांदुरमध्यमेश्वर ते संवत्सर, खेडलेझुंगे, कानळद पूररेषा निश्चित करणे आणि रुई, देवगाव, खेडलेझुंगे, कोळगाव, कानळद, वाकद शिरवाडे परिसरात नाल्यांच्या पाण्यामुळे पिकांचे दरवर्षी होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना व कार्यवाही करणे, गोदावरी डावा कालव्यातील झाडेझुडपे काढणे, पालखेड डाव्या कालव्यावर विमोचक बसविणे, पुणेगाव-दरसवाडी कालवा विस्तारीकरण, अपूर्ण कामे, चांदवड तालुक्यातील दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालवा काजीसांगवी येथील भूसंपादन आदींचा आढावा घेऊन ते लवकर मार्गी लावण्याचे निर्देश देण्यात आले.

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sanctioned renovation left canal simp program of projects selection ysh

ताज्या बातम्या