सिन्नर येथील पाताळेश्वर विद्यालयाने दत्तक घेतलेला संतोष सदगीर हा विद्यार्थी आता कीर्तनकार झाला असून अलीकडेच शाळेला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्याने आठवणींना उजाळा दिला. विद्यालयाच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला. आज मी जोकाही आहे ते पाताळेश्वर विद्यालयामुळे. विद्यार्थ्यांनो, शिका, मोठे व्हा, आपल्या आवडीनुसार कला जोपासा.
आणि परत आपल्या शाळेकडे बघा, असा सल्ला त्याने विद्यार्थ्यांना दिला. सिन्नर तालुक्यातील आशापूर गावातील पाडाळी पाताळेश्वर विद्यालयाच्या आवारात गुरे चारणाऱ्याची त्यावेळी मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांच्याशी भेट झाली. देशमुख यांनी संतोषची चौकशी केली असता तो अनाथ असल्याचे समजले. विद्यालयाने त्याला दत्तक घेऊन त्याच्या पालन पोषणाची आणि शिक्षणाची सर्वस्वी जबाबदारी स्वीकारली.त्याला शिक्षणाची गोडी निर्माण होण्यासाठी प्रयत्न केले. तो विद्यार्थ्यांमध्ये राहू लागला. परंतु त्याचे मन शिक्षणात रमेना. त्याने नंतर आळंदीची वाट धरली. त्याचे हात पखवाजवर थाप मारूलागले. आपल्या स्मरणशक्तीच्या जोरावर गायन कला आत्मसात करून तो अभंग, भजन म्हणू लागला.
गावोगावी सप्ताहाच्या निमित्ताने फिरताना त्याला २० वर्षांनी शाळेची आठवण झाली. तो शाळेत आल्यावर मुख्याध्यापक आणि शिक्षकांना त्याने आपली ओळख करून दिली. कार्यक्रमास उपशिक्षक बी. आर. चव्हाण, आर. व्ही. निकम, एस. एम. कोटकर, आर. टी. गिरी, एम. सी. शिंगोटे आदी उपस्थित होते.