नाशिक : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानशी वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाने संभाव्य हवाई हल्ल्याबाबतच्या सुरक्षेसाठी सर्व राज्यांना बुधवारी रंगीत तालीम घेण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्रात १६ प्रमुख शहरांमध्ये हा सराव होणार आहे. त्यात मनमाड, सिन्नरसह नाशिक शहराचा समावेश आहे. त्या अनुषंगाने प्रशासन तयारीला लागले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात बैठक झाली. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी यासंदर्भात माहिती दिली. केंद्र आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या सूचनेनुसार बुधवारी दुपारी चार वाजता सराव केला जाणार आहे.

सर्वसामान्यांच्या सुरक्षेविषयी सूचना देण्यात येतील. यासाठी हवाई, अग्नी आणि ब्लॅकआऊट अशा तीन पातळीवर अभ्यास केला जाणार आहे पोलीस, अग्निशमन, आरोग्य विभाग, नागरिक संरक्षण, छात्रसेना आणि राष्ट्रीय सेवा योजना यांना सहभागी करून घेतले जाणार आहे. यासाठी के.टी.एच.एम. महाविद्यालयाची जागा निवडली आहे. सिन्नर आणि मनमाडबाबत नागरिक संरक्षण विभागाशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. ज्या जागा निवडल्या जातील, त्याठिकाणी सराव होईल. ब्लॅक आऊटचा सराव अंधार झाल्यावर होईल. त्यासाठी जागा निश्चित नाही. या अनुषंगाने मंगळवारी रात्री किंवा बुधवारी सकाळी बैठक होऊ शकते. काही ठिकाणी भोंगे बसवलेले आहेत, सद्यस्थितीबाबत तपासणी केली जात आहे. सरावाविषयी सर्व सूचना बुधवारी सकाळपर्यंत देण्यात येतील. भोंगे नादुरुस्त असतील तर ते सुरू केले जातील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. या सरावाचा वाहतूक किंवा सर्वसामान्यांच्या दैनंदिन कारभारात कोणताही फरक पडणार नसल्याचे त्यांनी नमूद केले.दरम्यान, मनमाड येथे मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाण्याच्या टाकीजवळ असलेला बंद पडलेला भोंगा दुरूस्त करण्यात आला. त्याची चाचणीही घेण्यात आली. या सरावावेळी काही वेळासाठी वीजपुरवठा बंद केला जावू शकतो. भोंगा वाजणे, वीज पुरवठा बंद झाल्यास घाबरू नका, अफवा पसरवू नका, ही सर्व तयारी आपल्या सुरक्षेसाठी आहे, असे आवाहन करण्यात आले आहे. मनमाड येथे असलेले भारतीय अन्न महामंडळाचे (एफ सीआय) साठवणूक केंद्र, राज्यातील १६ जिल्ह्यांसह परप्रांतात रस्ते व रेल्वे वाहतुकीद्वारे मनमाडनजिकच्या पानेवाडी बीपीसीएल इंधन साठवणूक केंद्रातून पाठविले जाणारे इंधन, भारतातील सर्व प्रमुख शहरांमध्ये मनमाड रेल्वे जंक्शन स्थानकांतून दररोज सुरू असलेल्या १४० प्रवासी रेल्वे गाड्यांतून सुमारे १८ हजार प्रवाशांची होणारी ये-जा, गुरूद्वारा यामुळे मनमाडची सरावासाठी निवड करण्यात आली आहे.

आज चार वाजता केटीएचएममध्ये सराव

बुधवारी दुपारी चार वाजता सराव केला जाणार आहे. पोलीस, अग्निशमन, आरोग्य विभाग, नागरिक संरक्षण, छात्रसेना आणि राष्ट्रीय सेवा योजना यांना सहभागी करून घेतले जाणार आहे. यासाठी के.टी.एच.एम. महाविद्यालयाची जागा निवडली आहे. ब्लॅक आऊटचा सराव अंधार झाल्यावर होईल. त्यासाठी जागा निश्चित नाही. या अनुषंगाने मंगळवारी रात्री किंवा बुधवारी सकाळी बैठक होऊ शकते.जलज शर्मा ( जिल्हाधिकारी)

मनमाड नगरपालिकेतर्फे भोंग्याची दुरूस्ती करण्यात आली. त्याची चाचणीही घेण्यात आली. ती यशस्वी झाली आहे. हा भोंगा पूर्वीप्रमाणे शहरात पहाटे आणि रात्री असा दोन वेळेला वाजविण्याची प्रथा सुरू करण्याचा प्रशासनाचा विचार आहे. शेषराव चौधरी (मुख्याधिकारी तथा प्रशासक, मनमाड)