नाशिक : जिल्ह्यातील स्वातंत्र्यसेनानी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे दिवंगत नेते नरेंद्र (नाना) मालुसरे यांच्या पत्नी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि निवृत्त शिक्षिका अनुराधाताई मालुसरे (९०) यांचे रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. आयुर्विमा महामंडळाचे अधिकारी आणि क्रीडा संघटक संजय मालुसरे यांच्या त्या मातोश्री व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी सुनील मालुसरे यांच्या त्या काकू होत. नाशिकमधील सामाजिक, राजकीय चळवळीत कार्यरत राहून कामगार, महिला, आदिवासींच्या उत्थानासाठी सतत लढा देत मालुसरे कुटुंबाने ठसा उमटविला आहे. या कार्यात अनुराधाताई यांचा सक्रिय सहभाग असे. राज्य आणि देशभरातील सामाजिक, राजकीय नेत्यांशी मालुसरे कुटुंबीयांचे असलेले ऋणानुबंध अनुराधाताई यांनी कायम जपले. नाना मालुसरे यांच्या पाठिशी त्या भक्कमपणे उभ्या राहिल्या.

हेही वाचा : तारण सोन्याचा पतसंस्थेकडून अपहार ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नानांना प्रकृतीच्या कारणास्तव राज्यात दौरे करण्यास मर्यादा आल्याचे पाहून अनुराधाताई त्यांच्यासमवेत भ्रमंती करू लागल्या. नानांच्या निधनानंतर कॉम्रेड नरेंद्र मालुसरे दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक, आदिवासी, शिक्षण, महिला विकास, कामगार, कृषी, पत्रकारिता आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक व्यक्ती आणि संस्थांना पुरस्कार दिला. त्यांच्या या कामाची विविध क्षेत्रांत आदराने दखल घेतली गेली. महापालिकेच्या शाळांत त्यांनी प्रदीर्घ काळ सेवा बजावली. उपक्रमशील शिक्षिका म्हणून त्या ओळखल्या जायच्या. शाळांतील तसेच परिसरातील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्या आर्थिक मदत करीत तसेच विनामूल्य शिकवणी घेत. अनुराधाताई यांच्या पार्थिवावर येथील अमरधाम स्मशानभूमीत गुरुवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.