नंदुरबार – अनेक शेतकऱ्यांना कित्येक फुट खोल कूपनलिका खोदल्यानंतरही पाणी लागत नसताना शहादा तालुक्यातील पुसनद येथे एका शेतकऱ्यासमोर भलतेच संकट उभे राहिले आहे. त्यांच्या शेतातील कूपनलिका रोज दोन वेळा शंभर फुटाचे पाण्याचे फवारे उडवत असल्याने शेतमालक पुरता धास्तावला आहे. वाया जाणाऱ्या पाण्यामुळे पिकांचे नुकसान होत असल्याने या घटनेची शासकीय अधिकाऱ्यांनी पाहणी करावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील पुसनद येथील विनायक पाटील यांच्या शेतात पिकांसाठी ८०० फुट खोल कूपनलिका करण्यात आली. सप्टेंबर २९२४ मध्ये एका रात्री त्यांना कूपनलिकेतून मोटार आणि पाईप बाहेर फेकल्याचे दिसून आले. पावसाळा असल्याने पाणी जास्त झाल्यामुळे सदरचा प्रकार झाला असावा, असा अंदाज करुन पाटील यांनी या घटनेकडे तेव्हां दुर्लक्ष केले.
चार ते पाच दिवसांपासून पुन्हा विनायक पाटील यांच्या शेतातील कूपनलिकेतून पाण्याच्या दाबाने मोटार, पाईप आणि वायर हे साहित्य बाहेर फेकले गेले. पाण्याचा फवारा आकाशात बऱ्याच उंचीपर्यंत गेला. यानंतर रोज असा प्रकार दोनवेळा होत असून पंप आणि पाईपांचे यामुळे नुकसान होत आहे. विशेष म्हणजे दिवसातून एक किंवा दोनदा अशा पद्धतीने या कूपनलिकेतून पाणी आकाशात शंभर फुटापर्यत उंच उडत असल्याने शेतकरी हैराण झाला आहे.
नाशिक : शहादा तालुक्यातील पुसनद येथे एका शेतकऱ्यासमोर भलतेच संकट उभे राहिले आहे. त्यांच्या शेतातील कूपनलिका रोज दोन वेळा शंभर फुटाचे पाण्याचे फवारे उडवत असल्याने शेतमालक पुरता धास्तावला आहे. pic.twitter.com/SkGFBYdL6m
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— LoksattaLive (@LoksattaLive) March 1, 2025
शेतात हरभरा आणि कांद्याचे पीक असून पाण्याची आवश्यता असताना कूपनलिकेतून वाया जाणाऱ्या पाण्यामुळे पिकांना पाणी मिळत नाही. पाटील यांचे पीक पाण्याअभावी जळू लागले आहे. या प्रकारामुळे आजूबाजूचे शेतकरीही धास्तावले असून प्रशासनाने हा प्रकार नेमका का होत आहे, याविषयी तपासणी करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे.