जळगाव – जावई प्रांजल खेवलकर विरोधात बोलणाऱ्या रूपाली चाकणकर यांना प्रत्युत्तर देताना एकनाथ खडसेंनी अपशब्द वापरल्याचा आरोप होत असताना, भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या व्यंगचित्राला जळगावमध्ये शुक्रवारी शाई फासून तीव्र निषेध केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खडसेंच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक करून भाजपला जशास तसे उत्तर दिले.

प्रांजल खेवलकर यांच्या घरातून पोलिसांनी जप्त केलेल्या भ्रमणध्वनीमधून महिलांसोबतच्या चॅटचे स्क्रिनशॉट, नग्न व अर्धनग्न छायाचित्रे तसेच काही अश्लील चित्रफिती सापडल्याचा खुलासा झाला आहे. या प्रकरणावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही तीव्र संताप व्यक्त करत वातावरण आणखी तापवले आहे. विशेषतः शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांना चाकणकर यांनी लक्ष्य केले आहे. चाकणकरांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे यांनी आपल्या जावयाच्या बाजूने भूमिका घेतली. मात्र, चाकणकर यांच्याविषयी बोलताना एकनाथ खडसे यांची जीभ घसरली. त्यांच्याविषयी त्यांनी अपशब्द वापरले.

त्यामुळे खडसेंनी रूपाली चाकणकर यांची जाहीर माफी मागावी. महिलांचा अपमान अजिबात खपवून घेतला जाणार नाही, अशा घोषणा भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जळगाव शहरात शुक्रवारी दिल्या. प्रसंगी एकनाथ खडसे यांच्या व्यंगचित्राला शाई फासली. भाजपच्या या आंदोलनाला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी शरद पवार गटाने शनिवारी जळगावात पक्ष कार्यालयासमोर आकाशवाणी चौकात एकनाथ खडसे यांच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक केला. आमचे नेते एकनाथ खडसे यांनी रूपाली चाकणकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा खोटा कांगावा भाजप करत आहे. हनीट्रॅपमध्ये अडकण्याच्या भीतीने जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी खोट्या केसेस करण्यासह खडसेंच्या प्रतिमेला शाई फासण्याचा केविलवाणा प्रकार त्यांच्याकडून करण्यात आला. जिल्ह्यात शेतीसह इतरही अनेक प्रश्न दुर्लक्षित असतानाना भाजपला त्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही, असा आरोप शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी केला.   

यावेळी शरद पवार गटाचे युवक जिल्हाध्यक्ष विश्वजीत पाटील, युवक शहराध्यक्ष रिकू चौधरी, माजी महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, सुनील माळी, मजहर पठाण, राजू मोरे, रिझवान खाटीक, इब्राहिम तडवी, जयप्रकाश चांगरे, किरण राजपूत, भगवान सोनवणे, प्रमोद पाटील, कलाबाई शिरसाठ, संजय पाटील, आशिफ शेख, आकाश हिवाळे, चेतन पवार, संजय जाधव, सुहास चौधरी, अमजद खाटीक, इम्रान खान, फारुक शेख, कैलास पाटील, रफिक पटेल, भल्ला तडवी, गणेश पाटील, प्रभाकर माळी, अविनाश माहिरे आदी उपस्थित होते.