जळगाव – आमदार रोहित पवार यांना सक्तवसुली संचालनालयातर्फे (ईडी) दुसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावण्यात आल्याने तसेच शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक झाला आहे. गुरुवारी दुपारी शरद पवार गटातर्फे येथे रास्ता रोको आंदोलन करुन जिल्हाधिकार्‍यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले. आंदोलनावेळी काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांना सक्तवसुली संचालनालयातर्फे (ईडी) दुसर्‍यांदा चौकशीसाठी बोलावण्यात आले. त्यामुळे शरद पवार गटातर्फे महामार्गावरील आकाशवाणी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, युवक महानगराध्यक्ष रिकू चौधरी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मंगला पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर आकाशवाणी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय पदयात्रा काढत जिल्हाधिकार्‍यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले.

हेही वाचा >>>नारायण सुर्वे यांच्या संकल्पनेतील ‘माझे विद्यापीठ’ साकारण्यात अडथळे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आंदोलनात एजाज मलिक, वंदना चौधरी, विकास पवार, वाल्मीक पाटील, वाय. एस. महाजन, अशोक पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्त उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. पाटील म्हणाले की,  केंद्र व राज्य सरकारकडून सक्तवसुली संचालनालयातर्फे कारवाई व धाक दाखवून विरोधी पक्षांच्या नेत्यांचे खच्चीकरण केले जात आहे. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवरही सरकार दुर्लक्ष करीत आहे. पीकविमा, कापसाला हमीभाव, सोयाबीन, तूर, कांदा निर्यातबंदी, शैक्षणिक संस्थांचे खासगीकरण, बेरोजगारी, इंधन दरवाढ आदी विषयांवर सरकार मूग गिळून आहे, असेही त्यांनी सांगितले.