जळगाव : जिल्ह्यात लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुकीतील दारूण पराभवानंतर राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसला लागलेल्या गळतीने काही केल्या थांबायचे नाव घेतलेले नाही. शरद पवारांचे विश्वासू ज्येष्ठ नेते विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूण गुजराथी पक्ष सोडून गेल्यानंतर राष्ट्रवादीची अवस्था आणखी जास्त केविलवाणी झाली आहे.
भाजपसह शिवसेनेची पाळेमुळे रूजली नव्हती त्यावेळी जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा दबदबा होता. जिल्ह्यातील निम्म्या मतदारसंघात आमदार, जिल्हा परिषदेसह पंचायत समित्या आणि नगर परिषदांवर राष्ट्रवादीचेच वर्चस्व होते. कालांतराने राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यांना सुरूंग लावण्याचे काम भाजपचे तत्कालीन नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांनी केले. पुढे जाऊन खडसे स्वतः राष्ट्रवादीत दाखल झाले. त्यामुळे पक्षाला नवी उभारी मिळण्याची चिन्हे दिसून आली. मात्र, अजित पवारांच्या बंडानंतर पक्षात फूट पडल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे उरलेसुरले अवसान गळून पडले. तशाही स्थितीत गेल्या वर्षी पार पडलेल्या लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुका शरद पवार गटाने ताकदीने लढल्या. मात्र, भाजप-शिवसेनेच्या रणनितीपुढे शरद पवार गटाचा अजिबात निभाव लागला नाही.
फूट पडल्यानंतरच्या काळात शरद पवार यांच्याकडे पाहून पहिल्या फळीतील नेते आमदार एकनाथ खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, माजी खासदार ईश्वर जैन तसेच माजी आमदार अरूण पाटील, दिलीप सोनवणे, कैलास पाटील आदींनी पक्षाची धुरा सांभाळली होती. मात्र, लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुकांत शरद पवारांच्या नावाने मते मागुनही फार काही फरक न पडल्याने एका पाठोपाठ बऱ्याच दिग्गजांनी पक्षाला हळूहळू सोडचिठ्ठी देण्यास सुरूवात केली. माजी मंत्री देवकर आणि डॉ. पाटील यांच्यापासून सुरू झालेली गळती मंगळवारी ज्येष्ठ नेते अरूण गुजराथी यांच्यापर्यंत येऊन थांबली. गेल्या सहा महिन्यांच्या कालखंडात दोन माजी मंत्री, तीन ते चार माजी आमदार आणि त्यानंतर आता अरूण गुजराथी यांनी शरद पवारांची साथ सोडली आहे.
अर्थात, शरद पवार गट सोडून गेलेले दोन माजी आमदार वगळता बहुतांश सर्व दिग्गजांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा पर्याय निवडला आहे. आता एकनाथ खडसे, दिलीप खोडपे, ईश्वर जैन आणि माजी आमदार संतोष चौधरी यांच्याशिवाय अन्य कोणी प्रभावशाली नेता शरद पवार गटात राहिलेला नाही. त्यातही खडसे वगळता पक्षाला पडतीच्या काळात मोठा आधार देऊ शकेल, असे कोणीच नाही. साहजिक, जळगावमध्ये शरद गटाला सावरण्याची मोठी जबाबदारी आता खडसेंवर आली आहे. त्यांच्या कन्या रोहिणी खडसेही शरद पवार गटात सक्रीय असल्या तरी त्यांच्याकडे राज्याची मोठी जबाबदारी आहे. त्यांना जिल्ह्याकडे लक्ष देण्यास जास्त वेळ नसतो. अशा स्थितीत, शरद पवार गटाला आता एकनाथ खडसेंचा तेवढा आधार राहिला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष कसा सावरतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.
