नाशिक – स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती शहरात विविध संस्था, राजकीय पक्ष, शासकीय कार्यालयांत विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. पोलीस आयुक्तालयाच्यावतीने आयोजित पोलीस आयुक्त आपल्या दारी उपक्रमांत आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मगाव असणाऱ्या भगूर येथील नागरिकांशी संवाद साधला. सावरकर स्मारकास भेट देऊन अभिवादन केले. बुधवारी भगूर येथील स्मारकात अभिवादन करण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. अभिनेते शरद पोंक्षे यांनी अभिनव भारत मंदिराच्या स्थितीवर नाराजी व्यक्त केली.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात साजरी करण्यात आली. बिहार प्रदेश प्रकोष्ठ संयोजक रामकुमार झा, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांच्या हस्ते सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. पोलीस आयुक्तालयाच्यावतीने पोलीस आयुक्त आपल्या दारी उपक्रम राबविला जातो. या उपक्रमात आयुक्त कर्णिक यांनी सावरकर स्मारकास भेट देऊन अभिवादन केले.
देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. शहर पोलिसांच्या दृष्टीने हा महत्वाचा परिसर आहे. स्थानिकांकडून बाहेरून या ठिकाणी वास्तव्यास येणाऱ्या भाडेकरुंची पडताळणी आणि अपुरे पोलीस मनुष्यबळ असे काही प्रश्न मांडले गेले. त्यांची पूर्तता केली जाईल, असे आश्वासन कर्णिक यांनी दिले.
महापालिकेत प्रभारी आयुक्त करिष्मा नायर आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी सावरकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. यावेळी सावरकरांची देशभक्ती, क्रांतिकारी विचारसरणी, समाजसुधारणेच्या कार्याचे स्मरण करण्यात आले.
शरद पोंक्षे यांची अपेक्षा
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी अभिनेते शरद पोंंक्षे यांनी शहरातील अभिनव भारत मंदिराला भेट दिली. या वास्तुच्या नुतनीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. आता हिंदुत्ववादी सरकार सत्तेत आहे. अभिनव भारतची ही वास्तू नवीन पद्धतीने न बांधता पूर्वी होती, त्याच पद्धतीने उभारायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या वास्तुची सध्या भयानक अवस्था आहे. या कामासाठी प्राप्त झालेला सहा कोटीचा निधी पूर्णपणे या कामावर खर्च व्हायला हवा, असा टोलाही त्यांनी बांधकाम विभागाला हाणला.