जळगाव : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागल्यानंतर पक्ष बळकटीसाठी महायुतीच्या सर्वच घटक पक्षांनी नवीन प्रवेश घडवून आणण्यावर भर दिला आहे. महाविकास आघाडीचीच नाही तर एकमेकांची माणसे सर्रासपणे फोडली जात आहेत. तशात शिंदे गटाचा आणखी एका मोठा पदाधिकारी आता राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेसच्या वाट्यावर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगूल वाजण्यापूर्वीच महायुतीच्या भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) या दोन्ही घटक पक्षांनी स्वबळाचा नारा दिला आहे. मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांनी ज्या ठिकाणी युती होत नसेल तिथे आपण रणांगणात उतरण्यास तयार असल्याची वक्तव्ये केली आहेत. जास्तीत जास्त जागा जिंकून भाजपची एकहाती सत्ता आणण्यासाठी मंत्री महाजन यांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आधीच तयारीत राहण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्या काही दिवसांत भाजपात प्रवेश करणाऱ्या नेत्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय वाढताना दिसली आहे. विविध पक्षांतील अनेक पदाधिकारी भाजपात सामील होत आहेत. या वाढत्या पक्ष प्रवेशांवर मंत्री महाजन यांनी प्रतिक्रिया देताना त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना विरोधकांची टीका थांबवायची असेल तर कोणीही कसाही असला तरी त्याला पक्षात घ्या. कुणाच्याही प्रवेशाला विरोध करू नका, असा सल्ला दिला आहे.
विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान महायुतीविरोधात उभ्या राहिलेल्यांना पक्षात न घेण्याचा निर्णय भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाने घेतला होता. मात्र आता तिन्ही पक्षांनी हा निर्णय बाजूला ठेवलेला दिसतो. दुसऱ्या पक्षातून येणाऱ्यांची काटेकोर चाळणी करावी, असा आग्रह विशेषतः मंत्री गुलाबराव पाटील यांचा होता. पण प्रत्यक्षात घडतंय त्याच्या उलट. सुरूवात अजित पवार गटाने केली, त्यानंतर भाजप आणि आता शिंदे गटानेही महायुतीविरोधात लढलेल्यांसह कुणालाही अडथळा न आणता प्रवेश देण्याचे धोरण स्वीकारले.
अशा परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप आणि शिंदे गट दोघेही स्वबळावर लढण्याची भाषा करताना दिसून येत आहेत. पाचोऱ्यात भाजपने शिंदे गटाच्या विरोधकांना आपल्या गळाला लावून आधीच वातावरण तापवले आहे. तर अमळनेरमध्ये शिंदे गटाने माजी आमदार शिरीष चौधरी यांना पक्षात दाखल करून भाजपला थेट अस्वस्थ करण्याची संधी साधली आहे. आगामी काळात महायुतीतील तिन्ही पक्षांमधील मतभेद आणि अंतर्गत तणाव अधिक टोकाला जाण्याची शक्यता अधोरेखित झाली आहे.
दरम्यान, शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नेते मंत्री गुलाबराव पाटील यांचे विश्वासू आणि पक्षाचे सहसंपर्क प्रमुख निलेश पाटील यांनी थेट राजीनामा अस्त्र उगारल्याने शिंदे गटात खळबळ उडाली आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर पाटील यांच्या जागी अचानक विष्णू भंगाळे यांची नियुक्ती झाल्यानंतर वादाची ठिणगी पडली होती.
विधानसभेच्या निवडणुकीत चांगले काम करूनही अचानक जिल्हाप्रमुखाचे पद काढून घेतल्याने निलेश पाटील कमालीचे नाराज झाले होते. त्यामुळे त्यांच्याकडे जळगावच्या सहसंपर्कप्रमुख पदाची नवीन जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र, पाटील हे शिंदे गटापासून थोडे अंतर राखूनच राहिले. जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू असताना, आता त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा शिंदे गटाचे सचिव संजय मोरे यांच्याकडे पाठवून दिला आहे. त्यांचा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश होणार असल्याचे बोलले जाते.
जळगाव महापालिकेची निवडणूक दीड महिन्यांवर आल्यानंतरही शिंदे गटाकडून कोणतीच हालचाल नाही. मेळाव्यांसह प्रभाग समिती बैठकांचे आयोजन केले जात नसून, पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना कोणीच विश्वासात घेत नाही. -निलेश पाटील (सहसंपर्कप्रमुख, शिवसेना शिंदे गट, जळगाव)
