जळगाव : शिवसेना पक्ष फुटीनंतर उत्तर महाराष्ट्रात प्रथमच मालेगावमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रविवारी जाहीर सभा होत आहे. या सभेसाठी ठाकरे गटाचे मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते ढोल-ताशांच्या गजरात नाचत व जोरदार घोषणाबाजी करीत रवाना झाले. उद्धव ठाकरे हे आमचे विठ्ठल आहेत व विठ्ठलाच्या दर्शनासाठी विठ्ठलाच्या वारीसाठी आम्ही मालेगावला जात असल्याच्या भावना ठाकरे गटाच्या पदाधिकार्यांनी मालेगावला रवाना होण्यापूर्वी व्यक्त केल्या.
सभेला उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधून पदाधिकारी व कार्यकर्ते रवाना होत आहेत. यात जळगाव जिल्ह्यातून उद्धव ठाकरे यांच्यावर निष्ठा असलेले पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने मालेगाव येथे रवाना झाले. धरणगाव येथील ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, युवासेनेचे जिल्हाप्रमुख व माजी नगराध्यक्ष नीलेश चौधरी, जिल्हा उपप्रमुख अॅड. शरद माळी, शहरप्रमुख भागवत चौधरी, जिल्हा उपप्रमुख योगेश वाघ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने मालेगावला रवाना झाले. धरणगाव येथील शिवस्मारकाला माल्यार्पण करून जय भवानी, जय शिवाजी अशी जोरदार घोषणाबाजी करीत खासगी बसमधून ते रवाना झाले.
यावेळी सहसंपर्कप्रमुख वाघ म्हणाले की, शिवगर्जना महामेळाव्याच्या माध्यमातून हा विरोधकांवर एल्गार राहणार आहे. राज्यभरात गारपीट व अवकाळी पावसाने शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अजूनही सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकर्यांना भरपाई मिळालेली नाही. या सरकारला वठणीवर आणण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उत्तर महाराष्ट्रात दौरा करीत आहेत. नीलेश चौधरी म्हणाले की, आम्ही सभेला नव्हे तर उद्धव ठाकरे यांच्या विठ्ठलरूपी दर्शनला जात आहोत. आम्ही विठ्ठलाच्या दर्शनाला वारी करून जात आहोत. आमच्या या दैवताला भेटण्यासाठी आनंदाने, नाचत जात आहोत. ठाकरे यांचे विचार आम्ही तळागाळापर्यंत पोहोचविणार असल्याचेही ते म्हणाले.