राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांची अवस्था ‘सहन होत नाही अन् सांगताही येत नाही’

प्रल्हाद बोरसे

मालेगाव : शिवसेनेचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडून सापत्नपणाची वागणूक मिळत असून राज्यातील सत्तेचा पक्षवाढीसाठी अजिबात लाभ होत नसल्याचा सूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून सतत लावला जातो. त्या पाश्र्वभमीवर नाशिकचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या हस्ते चक्क शिवसेना कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे ‘सहन होत नाही अन् सांगताही येत नाही’ अशी अवस्था येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची झाली आहे.

राज्याच्या राजकारणात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्रित सत्तेत असले तरी अशा पद्धतीने एखाद्या वरिष्ठ नेत्याने थेट मित्र पक्षाच्या कार्यालयाचे आपल्या हस्ते उद्घाटन करण्याची बाब दुर्मिळ असल्यामुळे भुजबळ यांच्या या कृतीने सर्वाच्याच भुवया उंचावल्या आहेत.

तालुक्यातील खाकुर्डी येथे नुकताच श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळय़ाचा अनावरण सोहळा मोठय़ा दिमाखात पार पडला. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झालेल्या या पुतळा अनावरण सोहळय़ास कृषिमंत्री दादा भुसे, शिवव्याख्याते प्रा.नितीन बानगुडे पाटील, शिवशाहीर विजय तनपुरे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या सोहळय़ाला जोडूनच शिवसेनेतर्फे खाकुर्डी येथे सुरु करण्यात आलेल्या काटवन विभाग मध्यवर्ती संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी भुजबळ यांच्या हस्ते सेना कार्यालयाचे उद्घाटन झाले.

भुसे हे केवळ शिवसेनेचे हित बघत असतात, मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला विश्वासात घेत नाहीत, त्यामुळे राज्यात महाआघाडी सरकार असण्याचा स्थानिक पातळीवर पक्षाला कुठलाच फायदा होतांना दिसत नाही, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते वेळोवेळी बोलून दाखवतात. याशिवाय शिवसेनेमुळे पक्षाची फरफट होत असल्याने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक स्वबळावर लढण्याचा आग्रहदेखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पातळीवरून धरला जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मध्यंतरी संजय गांधी निराधार योजनेच्या समिती सदस्यांच्या निवडीत राष्ट्रवादीला कसे डावलण्यात आले, याबद्दलही नाराजी व्यक्त झाली होती. या समितीत नऊ सदस्यांपैकी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी दोन सदस्यांची वर्णी लागणे अपेक्षित होते. मात्र सेनेच्या तब्बल आठ आणि राष्ट्रवादीच्या एकमेव सदस्याचा समावेश झाल्याबद्दल आक्षेप घेतला गेला होता. अशी सर्व राजकीय पार्श्वभूमी      असताना सहकार्य करत नसल्याचा आक्षेप असणाऱ्या मित्र पक्षाच्या कार्यालयाचे भुजबळांच्या हस्ते झालेले उद्घाटन म्हणजे राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याची प्रतिक्रिया उमटली आहे.