लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक: राज्य शासनाच्या पर्यटन संचालनालयाच्या वतीने १२ आणि १३ ऑगस्ट रोजी श्रीराम महोत्सव आयोजित करण्यात आला असून याअंतर्गत विविध कार्यक्रमांचे नियोजन असल्याची माहिती पर्यटन संचालनालयाच्या मधुमती सरदेसाई यांनी दिली.

दोन दिवसांच्या या महोत्सवात १२ ऑगस्ट रोजी रामायण सर्किट सहल आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमाचे भाडे १०० रुपये आहे. यामध्ये पर्यटन विभागाच्या प्रशिक्षित मार्गदर्शकांसोबत नाशिक परिसरातील श्रीरामाशी सबंधित पर्यटन स्थळांना भेटीसह त्यांची माहिती देण्यात येणार आहे, त्यात अंजनेरी, कावनई, टाकेद, तपोवन, काळाराम मंदिर, सितागुंफा, रामकुंड या पर्यटन स्थळांचा समावेश आहे.

आणखी वाचा-“आदित्य ठाकरे यांच्या डोळ्यांवर पट्टी”, बारसूवरून देवेंद्र फडणवीस यांची टीका

या महोत्सवानिमित्त १३ रोजी कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पहिली ते दुसरी, तीसरी ते चौथी, पाचवी ते सातवी, आठवी ते १० वी, अशा चार गटामध्ये ही स्पर्धा विभागण्यात आली आहे. सकाळी ९.३० पासून दुपारी एक या वेळेत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी ८१०८५८९८५६ या क्रमांकावर संपर्क करावा. १३ रोजी सायंकाळी सहा वाजता नादब्रह्म या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये रामरक्षा मंत्र पठण, भरतनाट्यम, कथक, रामायणातील प्रसंग सादरीकरण, चित्रफित. वाद्य व गायन सादरीकरण, आणि चित्रकला स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९८९००१११२०, ०२५३-२९९५४६४ क्रमांकावर संपर्क साधावा.