नंदुरबार – तब्बल तीन वेळा तपासणी आणि चाचण्या करुनही नंदुरबार जिल्ह्यातील सिकलसेल बाधितांचा अचूक आकडा प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याचे वास्तव आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांच्या दौऱ्यात उघड झाले.
नंदुरबार जिल्हा आरोग्य प्रशासनाने स्वत: तसेच आणि आर्म फोर्स वैद्यकीय महाविद्यालयामार्फत सिकलसेल चाचण्या करुनही त्याची आकडेवारी प्रशासनाकडे नाही. सिकलसेलची खरेदी केलेली औषधेही रुग्णांपर्यत पोहचत नसल्याच्या तक्रारी रुग्णांनी थेट आरोग्यमंत्र्यापुढे केल्याने सिकलसेलच्या नावाखाली होत असलेली करोडो रुपयांची औषध खरेदी कोणासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील सिकलसेल रुग्णांचा प्रश्न गंभीर झाला असतांनाच आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांनी केलेल्या नंदुरबार जिल्हा दौऱ्यात त्यांच्यादृष्टीने सिकलसेलचा प्रश्न सर्वाधीक महत्वाचा असल्याचे दिसून आले. परंतु, जिल्हा प्रशासन सिकलसेलप्रश्नी किती गंभीर, हेच या दौऱ्यातील गंभीर बाबीतून उघड झाले.
गत वर्षात आर्म फोर्स वैद्यकीय महाविद्यालयाच्या मदतीने जिल्ह्यात सिकलसेल चाचणीचे महत्वाकांक्षी अभियान राबविण्यात आले. या अभियानात जिल्ह्यातील तीन लाख ९० हजारापेक्षा अधिक शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यांची सिकलसेल चाचणी करण्यात आली. यासंदर्भातील सर्व माहिती जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांना उपचारास मदत करण्यासाठी हस्तांतरीत केली जाणार असल्याने त्याचे एका पोर्टलवरील लॉगीन जिल्हाधिकारी यांच्यासह आरोग्य यंत्रणेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर देखील देण्यात येणार होते.
सुत्रांनुसार, या चाचण्यांमध्ये ६० हजारांहुन अधिक सिकलसेल बाधीत आणि वाहक आढळून आल्याने आगामी काळात जिल्ह्यात सिकलसेल आजाराचा विस्फोट होण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. अन्य संस्थेमार्फत चाचण्या होवूनही जिल्ह्यातील आरोग्य प्रशासनाकडे सिकलसेल बाधीतांचा निश्चित आकडा नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत आरोग्यमंत्री आबीटकर यांनीही नाराजी व्यक्त करत सिकलसेल बाधितांच्या उपचारावर विशेष लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेला दिल्या.
विशेष म्हणजे, नंदुरबार जिल्ह्यातील सध्याच्या सिकलसेल बाधितांची आकडेवारी पाहता प्रशासनाकडून सिकलसेलवरील उपचारासाठी कोट्यवधींची औषधे खरेदी करत आहे. धडगाव मध्ये एका सामाजिक कार्यकर्त्यांने तो स्वत: सिकलसेल बाधीत असूनदेखील त्याला उपचारासाठी संबंधीत प्राथमिक आरोग्य केंद्रातून सिकलसेलची औषधेच मिळत नसल्याची तक्रार केली. सिकलसेलचा प्रश्न जिल्ह्यात गंभीर झाला असताना यासाठी खरेदी केलेली औषधे जातात तरी कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सिकलसेलसाठी किती रुपयांची आणि किती औषधे येतात, ती आरोग्य केंद्र, उपकेंद्रांपर्यंत जातात की नाही, याची चौकशी करण्याची गरज व्यक्त होत आहे.