जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मंगळवारी देखील चांदीने जीएसटीसह प्रति किलो एक लाख १८ हजार ४५० रूपयांचा उच्चांकी दर गाठला. चांदीची दरवाढ थांबण्याची कोणतीच चिन्हे दिसत नसल्याने ग्राहकांसह व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. बाजारातील आर्थिक उलाढालीवरही त्याचा परिणाम झाल्याचे बोलले जात आहे.
जळगावमध्ये सोमवारी चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख १७ हजार ४२० रूपये प्रति किलो होते. दुसऱ्या दिवशी मंगळवारी बाजार उघडताच चांदीच्या दरात १०३० रूपयांची वाढ नोंदविण्यात आली. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख १८ हजार ४५० रूपयांपर्यंत जाऊन पोहोचले. चांदीच्या दराची घोडदौड काही केल्या थांबतच नसल्याने ग्राहक आणि व्यावसायिक दोन्ही वर्ग अवाक झाले आहेत. एरवी दागिन्यांसह विशेष प्रसंगी वापरल्या जाणाऱ्या ताट, ताटल्या, वाट्या, ग्लास बनविण्यासाठी चांदीचा सर्वाधिक उपयोग होत असे. मात्र, अलिकडच्या काळात चांदीचा इतर बऱ्याच अनेक कारणांसाठी वापर वाढला आहे.
चांदी उत्कृष्ट विद्युतवाहक असल्याने बटने, सर्किट बोर्ड आणि इतर विद्युत उपकरणांमध्ये सर्रास वापरली जात आहे. याव्यतिरिक्त सौर पॅनेलमध्ये प्रकाश ऊर्जा रूपांतरित करण्यासाठी सुद्धा चांदीचा उपयोग केला जात आहे. चांदीचा उपयोग आरसे बनवण्यासाठीही होतो, कारण ती प्रकाशाचे उत्तम परावर्तन करते. चांदीपासून तयार केलेले सिल्वर नायट्रेट फोटोग्राफीच्या फिल्ममध्ये वापरले जाते. हल्ली दातांमध्ये भरण्यासाठी चांदी वापरण्याची तर फॅशनच झाली आहे. चांदीचा उपयोग दोन धातू सांधण्यासाठी तसेच ब्रेझिंग आणि इतर औद्योगिक कामांमध्ये देखील होतो. या सर्व कारणांमुळे चांदीची मागणी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. चांदीचे दर उत्तरोत्तर वाढण्याचे तेच प्रमुख कारण असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. दरम्यान, चांदीचे दर दररोज नवीन उच्चांक गाठत असताना स्थानिक पातळीवर चांदीची किरकोळ मागणी खूपच कमी झाली आहे. त्याचा मोठा परिणाम व्यवसायावर झाल्याने संबंधित व्यावसायिकांकडून चिंता व्यक्त होत आहे.
सोन्याच्या दरातही ७२१ रूपये वाढ
जळगावमध्ये सोमवारी २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति तोळा एक लाख एक हजार ९७० रूपये होते. दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी बाजार उघडताच सोने दरात ७२१ रूपयांची वाढ नोंदविण्यात आली. परिणामी, सोन्याचे दर एक लाख दोन हजार ६९१ रूपयांपर्यंत जाऊन पोहोचले.
चांदी दररोज नवीन उच्चांक गाठत असल्याने जवळपास व्यवसायाची उलाढाल निम्म्याने कमी झाली आहे. आवाक्याबाहेरील दर लक्षात घेता ग्राहक चांदीचे दागिने किंवा भांडी खरेदी करताना विचार करू लागले आहेत. विश्वास लुंकड (संचालक- लुंकड ज्वेलर्स, जळगाव)