नाशिक : २०२७ मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची प्रशासकीय तयारी जोरात सुरु आहे. राज्य शासनाकडूनही विविध कामांसाठी उपाययोजना करण्यात येत असताना नाशिक महापालिकेकडूनही कामांचे नियोजन करण्यात येत आहे.
नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे प्रमुख केंद्र गोदावरी काठचा परिसर आहे. कुंभमेळ्यात देशभरातून मोठ्या प्रमाणावर भाविक येण्याची शक्यता असल्याने भाविकांच्या गर्दीला सामावून घेण्यासाठी आणि भाविकांना गोदावरीत व्यवस्थित स्नान करता यावे, यासाठी गोदावरीच्या दोन्ही तीरांवर व्यवस्था करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून रामकुंडाजवळील वस्त्रांतरगृहाचे पाडकाम करण्यात आले. कुंभमेळ्यात रामकुंडातच साधू, महंत, विविध आखाडे स्नान करतात. त्यासाठी वस्त्रांतरगृहाची इमारत हा मोठा अडथळा ठरण्याची शक्यता असल्याने ही इमारतच पाडण्यात आली. त्यामुळे त्या ठिकाणी विस्तृत घाट करता येणे शक्य होणार आहे. जेणेकरुन गर्दीचे नियोजन करणे शक्य होणार आहे.
यावर्षी गोदावरीला आलेल्या पुरामुळे रामसेतू पुलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. दोन्ही बाजूचे लोखंडी कठडे काही ठिकाणी तुटले. काही ठिकाणी वाकले. रामसेतू धोकादायक झाल्याने तो याआधीच वाहनांसाठी बंद करण्यात आलेला आहे. रामसेतू पाडण्यात येणार आहे. यामुळे भाविकांच्या सोयीसाठी नवीन पूल प्रस्तावित आहे. कुंभमेळा तयारीचा भाग म्हणून नाशिक महानगरपालिका गोदावरी नदीवर राम झुला पूल बांधणार आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. या राम झुला पुलाची काही वैशिष्ट्ये आहेत. हा पूल संपूर्णपणे केबलच्या सहाय्याने तयार करण्यात येणार असून या पुलासाठी नदीत कोणताही स्तंभ राहणार नाही. नाशिक शहराकडील बालाजी कोटपासून ते पंचवटीकडील गणेशवाडी भाजी बाजारापर्यंत हा राम झुला राहणार आहे.
नाशिक महानगरपालिकेने या राम झुला पूल कामासाठी निविदा प्रक्रियेला सुरुवातही केली आहे. सुमारे २४.११ कोटी रुपयांचा खर्च असणारा हा राम झुला केवळ पादचाऱ्यांसाठी राहणार आहे. कुंभमेळ्यात या पुलामुळे भाविकांना एका तिरावरुन दुसऱ्या तिरावर सहजपणे जाता येणै शक्य होणार आहे. गोदावरीच्या दोन्ही काठांवरच अनेक मंदिरे आहेत. या पुलाचा कुंभमेळाव्यतिरिक्त पंचवटीतून थेट सराफ बाजार, भांडी बाजार आणि मेनरोडकडे पायी जाणाऱ्यांना फायदा होणार आहे. तज्ज्ञांच्या सहकार्याने राम झुल्यासाठी विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला असून महानगपालिकेच्या सर्वसाधारण सभेचीही मंजुरी घेण्यात आली आहे.
आता त्यासाठी निविदा प्रक्रिया करण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकल्पासंदर्भातील निविदापूर्व बैठक ३० ऑक्टोबर रोजी होणार असून सहा नोव्हेंबर ही निविदा दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. सात नोव्हेंबर रोजी निविदा खुली केली जाणार आहे. डिसेंबरपासून राम झुला पुलाच्या कामाला सुरुवात होईल. मार्च २०२७ पर्यंत पुलाचे काम पूर्ण व्हावे, असा प्रयत्न असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली.
