अनिकेत साठे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक : दीडशे एकरच्या घनदाट क्षेत्रात अंधार पडला की, ठराविक अंतरावर लाल-हिरव्या रंगांचे दिवे लुकलुकण्यास सुरूवात होते. जोडीला किर्रर्र…आवाज कानी पडू लागतो. सकाळी सूर्यदर्शन होईपर्यंत अविरतपणे हे सुरू असते. सौर उर्जेवर २१० लुकलुकणारे दिवे आणि विशिष्ट ध्वनिची यंत्रणा बिबट्याला दूर ठेवण्यात महत्वाची भूमिका निभावत आहे. शहर परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार आणि हल्ले वाढत असताना त्यापासून बचावासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने हे खास तंत्र विकसित केले आहे.

शहरालगतच्या गोवर्धन शिवारात दीडशे एकरच्या विस्तीर्ण क्षेत्रात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कार्यरत आहे. गंगापूर धरणालगतचा हा परिसर आहे. यात मुख्यालय, अन्य विभागांच्या इमारती, अधिकारी-कर्मचाऱ्यांची निवासस्थाने व विश्रामगृह वगळता उर्वरित संपूर्ण परिसर फळा,फुलांच्या झाडांनी बहरलेला आहे. आंबे, चिकू, फणस, पेरू, लिची, नारळ, निलगिरी, साग आदींच्या शेकडो झाडांंमुळे जंगलात आल्याची अनुभूती मिळते. बिबट्यांच्या नैसर्गिक अधिवासास अतिशय अनुकूल असे हे क्षेत्र आहे. त्यामुळे काही वर्षांपासून हा परिसर बिबट्यांचे आश्रयस्थान बनल्याचे चित्र होते. काही महिन्यांपूर्वी रात्रीच्या वेळी बिबट्याने सुरक्षा रक्षकावर हल्ला केल्याची घटना घडली होती. आवारातील कुत्र्यांवर बिबट्याने अनेकदा हल्ले केले होते. सीसीटीव्हीत बिबट्याचा मुक्त संचार वारंवार कैद झाला आहे. विद्यापीठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बिबट्याने लहान मुलावर हल्ला केल्याचे अधिकारी सांगतात. बिबट्याच्या संचारामुळे भयग्रस्त वातावरणात वावरणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी विद्यापीठाने या अनोख्या प्रणालीची संकल्पना प्रत्यक्षात आणली.

हेही वाचा… राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्यावर जीवघेणा हल्ला; नाशिकमधील धक्कादायक घटना

विद्यापीठ परिसर बिबट्यापासून सुरक्षित राखण्यासाठी या प्रणालीवर सुमारे १० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. एक-दीड महिन्यांपूर्वी कार्यान्वित झालेल्या या यंत्रणेने बिबट्यांना आवारातून दूर ठेवणे शक्य झाल्याचे विद्यापीठ प्रशासनाचे निरीक्षण आहे. या व्यवस्थेमुळे रात्रीच्या वेळी सुरक्षारक्षक परिसरात मार्गक्रमण करू शकतात. बिबट्यांची भीती त्यांना राहिलेली नाही.

प्रणालीने नेमके काय झाले ?

मुक्त विद्यापीठाच्या परिसरात ठराविक अंतरावर कमी उंचीवर एकूण २१० खांब उभारण्यात आले आहेत. सौर ऊर्जेवर ही प्रणाली काम करते. सूर्य मावळला की, स्वयंचलीत पध्दतीने प्रणाली सुरू होते. प्रत्येक खांबावरील हिरव्या आणि लाल रंगातील दिवे लुकलुकण्यास सुरूवात होते. त्यावरील ध्वनिक्षेपकातून दर १० ते ३० सेकंदांच्या अंतराने विशिष्ट आवाज निघतो. संपूर्ण दीडशे एकरच्या परिसरात रात्रभर लुकलुकणाऱ्या दिव्यांचा प्रकाश आणि आवाज सर्व भागात येतो. गडद रंगाचा प्रकाश आणि आवाजाने हा परिसर बिबट्यांपासून मुक्त झाल्याचे चित्र आहे. महिनाभरात बिबट्याचे कुठेही दर्शन घडलेले नाही. सीसीटीव्हीत तो कैद झालेला नाही. या प्रणालीसाठी विद्यापीठाने नऊ ते १० लाख रुपये खर्च केला आहे.

हेही वाचा… जळगावात चंद्रकांत पाटलांविरोधात रास्ता रोको; ठाकरे गटातर्फे आंदोलन; महामार्गावर दोन्ही बाजूंनी मोटारींच्या रांगा

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने ही प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे परिसरात बिबट्याची भीती राहिलेली नाही. धरणालगतच्या परिसरातून बिबट्या विद्यापीठ परिसरात येत असे. ज्या घनदाट झाडीच्या भागात त्याचे दर्शन घडले होते, मुख्यत्वे तिथे आणि अन्य भागातही दिवे, आवाजाची प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. – डॉ. प्रकाश देशमुख (प्रभारी कुलसचिव, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Solar power fencing system made area secure against leopard asj
First published on: 14-12-2022 at 11:54 IST