लोकसत्ता वार्ताहर

मनमाड: मध्य रेल्वे प्रशासनातर्फे रेल्वे स्थानक आणि परिसराच्या विकासासह प्रवाशांचा रेल्वे प्रवास अधिक जलद व सुखकर आणि सोयीचा व्हावा, या दृष्टीने विविध विकास कामे सुरू आहेत. या अंतर्गत भुसावळ ते मनमाड या अहोरात्र व्यस्त असलेल्या मार्गावर भुसावळ- मनमाड दरम्यान तिसरा रेल्वे मार्ग टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याअंतर्गत नांदगाव ते मनमाड दरम्यान २५.०९ किलोमीटरचे काम यावर्षी सुरु होण्याची शक्यता आहे.

भुसावळ ते पाचोरा ७१.७२ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. भुसावळ- मनमाड तिसरा लोहमार्ग एकूण १८३.८४ किलोमीटर अंतराचा आहे. यावर १३६०.१६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. भुसावळ ते पाचोरा या विभागाची कामे पूर्ण झाली आहेत. चाळीसगाव ते पिंपरखेड ३१.१९ किलोमीटर आणि नांदगाव ते मनमाड २५.९ किलोमीटरचे काम आता सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या पाचोरा ते चाळीसगाव ४४.९४ किलोमीटर आणि पिंपरखेड ते नांदगाव १०.४० किलोमीटरचे काम सुरू आहे.

आणखी वाचा-Nashik Bus Accident : सप्तश्रृंगी गडावर बस दरीत कोसळली, एकाचा मृत्यू, १५ प्रवासी जखमी, मदत कार्य सुरू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पार्श्वभूमीवर, भुसावळ ते मनमाड तिसर्या लोहमार्गाच्या अस्तरीकरणाचे काम पूर्ण होण्याचे संकेत रेल्वे प्रशासनाने दिले आहेत. प्रामुख्याने उत्तर भारतातून आणि राज्याच्या विविध भागातून भुसावळ- मनमाडमार्गे मुंबईला जाणाऱ्या प्रवासी रेल्वे गाड्यांची संख्या जास्त आहे. हा मार्ग अहोरात्र व्यस्त असतो. भुसावळ- मनमाड तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते हावडा या व्यस्त मार्गावरील मनमाड -भुसावळ विभागातील रेल्वे गाड्यांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. त्यामुळे रेल्वेचा वेग वाढण्यासही मदत होईल, शिवाय प्रवासी गाड्याबरोबरच मालवाहतूक गाड्या देखील मोठ्या प्रमाणावर या मार्गाने धावतील. त्यामुळे रेल्वेला मोठा महसूल यातून मिळण्याची अपेक्षा आहे. त्या अनुषंगाने सध्या या कामाला वेग देण्यात आलेला आहे. मनमाड -दौंड दुहेरी मार्गाचे कामही युद्ध पातळीवर सुरू आहे.